(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Lakshman Jagtap: आजारी असताना देखील बजावला मतदानाचा हक्क; फडणवीसांकडून जगतापांना विजय समर्पित
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभेतील भाजपचा विजय आमदार लक्ष्मण जगतापांना समर्पित केला. हीच खरी कामाची पावती आहे, असं मत आमदार जगतापांचे भाऊ शंकर जगतापांनी केलं.
Pune Lakshman Jagtap: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभेतील भाजपचा विजय आमदार लक्ष्मण जगतापांना समर्पित केला. हीच भाऊंच्या कामाची आणि श्रद्धेची पोचपावती आहे. असं वक्तव्य आमदार जगतापांचे भाऊ शंकर जगतापांनी केलं.
प्रतिकूल परिस्थितीत आमदार जगताप अॅम्ब्युलन्स मधून मुंबईला गेले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बाब आमच्यासाठी सार्थ अभिमानाची आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते फडणवीसांनी विजयानंतर सर्वात आधी भाऊंचा उल्लेख केला आणि हा विजय जगतापांना समर्पित करत असल्याचं नमूद केलं. हा क्षण कुटुंब आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी नक्कीच अभिमानास्पद ठरल्याची भावना शंकर जगतापांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप राज्यसभेच्या मतदानासाठी अॅम्ब्युलन्समधून मुंबईत गेले होते. त्यांनी आजारी असतानादेखील मतदानाचा हक्क बजावला. आजारी असल्याने लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत आणण्यासाठी रस्तेमार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवण्यात आली होती.
हे गेल्या दोन महिन्यांपासून ते आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले. कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुक्ता टिळकांनी देखील केलं मतदान
भाजप आमदार मुक्ता टिळक गंभीर या आजाराने ग्रस्त असताना देखील मतदानासाठी विधान भवनात हजर राहिल्या. मुक्ता टिळक यांना तर स्ट्रेचरवर बसून विधिमंडळात आणण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत आमदार गिरीश महाजन होते.
भाजपच्या प्रयत्नांना यश
राज्यसभा निवडणुकीत एकही मत वाया जाऊ नये, म्हणून भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. राज्यात सर्वत्र या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
'अकेला फडणवीस क्या करेगा' असं अनेक विरोधी पक्षातीन नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत फडणवीसांच्या खेळीने तीन उमेदवार विजयी झाले. यामुळे फडणवीसांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील फडणवीसांचं कौतुक केलं आहे.