(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Daund News : निर्दयी मायबाप! तीन महिन्याच्या बाळाला उघड्यावर दिलं टाकून, शेतकऱ्यांना रडण्याचा आवाज आला अन्...
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील रावणगाव येथे एका तीन महिन्याच्या बाळाला महामार्ग रस्त्याच्या आणि सर्व्हिस रोडच्यामध्ये असलेल्या चारीत टाकून दिल्याची घटना घडली आहे.
Daund News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Daund) दौंड तालुक्यातील रावणगाव येथे एका तीन महिन्याच्या बाळाला (Baby) महामार्ग रस्त्याच्या आणि सर्व्हिस रोडच्यामध्ये असलेल्या चारीत टाकून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात पालक आणि आई-वडिलांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वर रांधवण यांच्या शेताजवळ महामार्ग आणि महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या मधील चारीत एका तीन महिन्याच्या बाळाला कडाक्याच्या थंडीत टाकून दिल्याची घटना शुक्रवारी निदर्शनास आली. चारीत एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने नागरिकांनी धाव घेतली. तीन महिन्याची मुलगी अंगावर लाल रंगाचा स्वेटर आणि गुलाबी शालीत गुंडाळुन ठेवलेली होती. या शेतकऱ्यांनी या बाळाच्या नातेवाईकांचा आजुबाजुच्या परीसरामध्ये खूप वेळ शोध घेतला. मात्र आसपास कोणी नव्हते . त्यामुळे शेतकऱ्यांनी हा प्रकार दौंड पोलीस ठाण्यात फोनवर कळवला. शेतकरी पद्माकर कांबळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. दरम्यान,या बाळाच्या नातेवाईकांचा शोध दौंड पोलीस घेत आहेत.
बाळाच्या रडण्याच्या आवाजावरुन प्रकार समोर
महामार्ग आणि सेवा रस्त्याच्यामध्ये एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज येत होता. शेतकरी पद्माकर कांबळे, ईश्वर रांधवन अनिकेत रांधवन, युवराज रांधवन यांनी बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्याच दरम्यान त्यांना तीन महिन्याची मुलगी गुलाबी शालीत गुंडाळुन ठेवलेली दिसली. थंडी असल्याने ती जोरात रडत होती. या शेतकऱ्यांनी या बाळाच्या नातेवाईकांचा आजूबाजुच्या परीसरामध्ये खूप वेळ शोध घेतला. मात्र मुलीने नातेवाईक सापडले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी अज्ञात पालकांवर मुलीला उघड्यावर सोडून देत परी त्याग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नातेवाईकांचा शोध सुरु
तीन महिन्याच्या मुलीला टाकून दिल्याने पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी नातेवाईकांचा शोध सुरु केला आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्या दरम्यान ही घटना घडल्याने या रस्त्याच्या आजूबाजूला पोलिसांनी शोध घेतला आहे. मात्र तरीही पालकांची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आता रावणगाव परिसरात पोलीस शोध घेतल आहे.