पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत रंगली पोलखोल स्पर्धा; विजेत्या पुणेकराला मिळणार 'हे' बक्षीस
राज्य सरकारच्या कामांची पोलखोल करणारे फोटो सोशल मीडीयावर टाका आणि रोख बक्षीस मिळवा असं आवाहन भाजपकडून करण्यात आलंय .

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांच्या कामांची पोलखोल करण्यासाठी पोलखोल स्पर्धांचं आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होऊन हजारो रुपयांची बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशाप्रकारे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून अशाप्रकारे सुरु झालेत .
'पुण्यातील खड्डे दाखवा आणि अकरा हजार रुपये मिळवा', 'पुण्यातील कचऱ्याचे ढीग दाखवा आणि एकवीस हजार रुपये मिळवा', 'पुण्यातील बसेसची दुरावस्था दाखवा आणि सात हजार रुपये मिळवा' अशी ही पोलखोल स्पर्धा आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून सध्या अशाप्रकारे एकमेकांची पोलखोल करण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत . नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुण्यातील दुरावस्थेचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करून ते फोटो या राजकीय पक्षांच्या अकाऊंटला टॅग करायचे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या स्पर्धेत सर्वोत्तम फोटो काढणाऱ्यांसाठी तीन बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्पर्धेला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडूनही अशीच स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या कामांची पोलखोल करणारे फोटो सोशल मीडीयावर टाका आणि रोख बक्षीस मिळवा असं आवाहन भाजपकडून करण्यात आलंय .
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर दोन्ही पक्षांकडून जाहिराती आणि फ्लेक्स बाजीवर उधळपट्टी सुरू आहे. पण या जाहिरातबाजीचा उपयोग होईलच याची खात्री नसल्याने या पक्षांकडून अशाप्रकारे नागरिकांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण पुणेकर या राजकीय पक्षांना चांगलंच ओळखून आहेत . या राजकीय पक्षांना नागरिकांच्या समस्यांची आठवण फक्त निवडणूक जवळ आल्यावरच का होते असा पुणेकरांचा सवाल आहे. बक्षिसाच्या अपेक्षेने या राजकीय पक्षाच्या अकाऊंटला मोठ्या प्रमाणात फोटो टॅग केले जात आहेत. पण अशा स्पर्धांमुळे खरचं या समस्या सुटतील का हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.























