पिंपरी : महाविद्यालयात लेक्चर बंक करुन मुलींची छेडछाड करण्याची जणू फॅशनच निघाली आहे. अशा टवाळखोरांना जरब बसवताना कॉलेज प्रशासनाची दमछाक होते. पिंपरी चिंचवडमधील प्रतिभा महाविद्यालयाने मात्र यावर जालीम उपाय शोधला आहे. लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या थेट पालकांनाच मेसेज जाणार आहे.
लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडा शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन थेट पालकांच्या कानावर पाल्यांचे प्रताप घातले जाणार आहेत. बारकोड स्कॅनर मशिन प्रतिभा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन हजार विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे. हे बारकोड म्हणजे एक प्रकारचं आयकार्ड आहे.
विद्यार्थ्यांना हे बारकोड असलेलं आयकार्ड घेऊन लेक्चरला बसणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या आयकार्डवरील बारकोड या मशीनद्वारे स्कॅन करुन विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. त्यानंतर तो सर्व डाटा महाविद्यालयाने बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये घेतला जातो आणि गैरहजर विध्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी लेक्चरला बसला नसल्यास, त्याची माहिती एसएमएसद्वारे कळवली जाते.
महाविद्यालयाकडून गैरहजरीची माहिती थेट पालकांना कळवली जात असल्यानं विद्यार्थ्यांनी वर्ग भरल्याचं चित्र आहे. महाविद्यालयानं सुरु केलेल्या या उपक्रमाचे स्वागत काही विद्यार्थ्यांनी केलं आहे तर विद्यार्थिनींनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशी हजेरी गरजेची असल्याच मत व्यक्त केलं आहे. पालकांना संपूर्ण माहिती मिळत असल्यानं पालकांची चिंता कमी झाल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली. यामुळे अनुचित प्रकार कमी घडतील असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
बारकोड पद्धतीच्या या आयकार्डद्वारे त्यांच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती देखील प्राप्त होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अपघात झालाच तर रुग्णालयातील यंत्रणेला त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती या आयकार्ड द्वारे त्यांना प्राप्त होणार आहे. यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील चाळीस रुग्णालय या सिस्टीमशी त्यांनी अटॅच केली आहेत.
प्रतिभा महाविद्यालयानं विध्यार्थ्यांच्या हजेरीसाठी सुरु केलेली हि बारकोड पद्धत नक्कीच कौतुकास्पद आहे. हीच पद्धत राज्यातील सर्व महाविद्यालयानं सुरु केली तर वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षणाचा टक्काही वाढेल. तसेच यामुळे निदान महाविद्यालयांमध्ये शिक्षण घ्यायला आलेल्या मुली तरी सुरक्षित राहतील आणि पालकांची चिंताही दूर होईल, हे मात्र निश्चित. तेव्हा पालक, विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि सरकारने सर्व महाविद्यालयात हजेरीसाठी बारकोड पद्धत अवगत करण्याचा आग्रह धरणं गरजेचं आहे.