पिंपरी : लग्न म्हटलं की पाहुणे मंडळींचा लवाजमा आलाच. मग त्यांच्या सत्कारासाठी हार-तुरे, श्रीफळ, फेटे, टॉवेल-टोपी आलीच. पण पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नात पाहुणे मंडळींना केशरी आंब्याची रोप वाटली आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला. म्हणूनच मेहेत्रे कुटुंबीयांचं कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

 

 

हातात रोपटं घेऊन बसलेल्या महिला आणि पुरुष मंडळीना पाहून अनेकांसमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहिले असतील. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील मेहेत्रे कुटुंबाच्या घरातील सोनलच्या लग्नातलं हे आगळं वेगळं चित्र पाहून सर्वच अचंबित झाले. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींचे मान-पान स्वागत हार-तुरे, श्रीफळ, टॉवेल-टोपी, फेटे देऊन करण्याऐवजी मेहेत्रे कुटुंबीयांनी केशरी आंब्याची रोपं देऊन केलं.

 
मुलगी बीएससी अॅग्री झाल्यानं तिचीही पर्यावरणाशी नाळ जुळलेली. त्यातच राज्य सरकारच वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरु होता. मग काय, मेहेत्रे परिवाराने देखील या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मुलीच्या लग्नात पाच हजार आंब्यांची रोपं वाटण्याचा निश्चय केला आणि 10 जुलैला झालेल्या लग्न सोहळ्यात ही रोपं भेट म्हणून देण्यात आली.

 
हा आगळा-वेगळा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचला आणि त्यांनी देखील मन की बात मध्ये याचा उल्लेख केला. लग्न समारंभात मानपानावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी मेहेत्रे कुटुंबीयांनी केशरी आंब्याची रोपं वाटत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधानांनी या उपक्रमाची दखल घेतल्यामुळे आता सर्वच स्तरातून मेहेत्रे कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे. पण समाजाने यातून काही धडा घेतला आणि सर्व लग्न समारंभात हेच चित्र दिसलं तरच मेहेत्रे कुटुंबीयांनी सुरु केलेला हा उपक्रम सार्थकी झाला असं म्हणता येईल.