पुणे: प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातंय.... तसेच प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असल्याचंही सांगितलं जातंय. पण हेच प्रेम जर एखाद्या विवाह झालेल्या महिलेवर झालं आणि प्रेम करणारा प्रियकर हा पोलीस अधिकारी निघाला तर... मग त्या महिलेच्या पतीची काय धडगत नाही. असाच काहीसा प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. विवाहीत महिलेवर असलेल्या प्रेमाखातर एका पीएसआयने त्या महिलेच्या पतीला दम दिल्याची घटना घडलीय. या प्रकरणी त्या पतीने थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. 


बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआय नितीन मोहिते यांनी त्यांचे प्रेम असलेल्या विवाहीत महिलेच्या पतीला दम दिला आहे. त्या पतीने पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे नितीन मोहिते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या दोघांतील फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. सदर महिलेला दोन मुली आहेत. 


सहा महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यातील एका महिलेने कौटुंबिक वादातून विष प्राशन केलं होतं. त्यातून ती बचावली. त्या प्रकरणाचा तपास पीएसआय नितीन मोहिते यांच्याकडे होता. कालांतराने त्या दाम्पत्यामधील वाद मिटला आणि मोहिते आणि त्या महिलेचे जवळचे संबंध प्रस्थापित झाले. सदर महिलेला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती. त्यासाठी नितीन मोहिते हा मार्गदर्शन करीत होता. 


स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नितीन मोहिते यांनी त्या महिलेला पुण्यात पाठवलं.  मी तुला एमपीएससीच्या तयारीसाठी पुण्यात पाठवतो. तेथे लागेल ती मदत करतो अशी भुरळ त्याने घातली. आपली पत्नी शिकून एखादी अधिकारी होईल या आशेवर पतीने त्यांना दोन मुली असताना सुद्धा तिला अभ्यासाठी परवानगी दिली. 


काही दिवसानंतर सदर महिलेने तिच्या कुटुंबाशी संपर्क तोडायला सुरवात केली. नंतर 16 जानेवारी रोजी सदर महिलेच्या हातावर नितीन नावाचा टॅटू तिच्या पतीला दिसून आला. यावर त्या पती-पत्नीचा वाद झाला. नितीन मोहितेने त्या महिलेला पुण्यात परीक्षेच्या तयारीसाठी पाठवलं होत. मोहितेने त्या महिलेच्या पतीला फोन करून तिला मंगळवारी घेऊन ये, तसेच तिला हात लावू नकोस नाहीतर तुझे हात पाय मोडेन असा दम देतानाचा ऑडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच सदर महिलेला पीएसआयच्या कंपनीत 10 टक्के भागीदारी देणार असल्याचं सांगतोय. 


पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांनी त्या पतीला फोन करुन जाब विचारला तर तुझे हातपाय मोडीन अशी भाषा वापरली. या प्रकरणी त्या पतीने पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार दिली आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते करीत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: