Electricity Theft at Baramati : तब्बल 5 वर्षांपासून वीजमीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी करणाऱ्या दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील मे. राजहंस दुग्ध उत्पादक संस्थेवर महावितरणच्या भरारी पथकानं दीड कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
गंलांडवाडी येथील मे. राजहंस दुग्ध उत्पादक संस्था असून, दुधावर प्रकिया करुन त्याचे उपपदार्थ बनविण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्याकरिता महावितरणकडून त्यांनी औद्योगिक वापराची वीजजोडणी घेतलेली आहे. याच वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी वीज कंपनीला मिळाली होती. त्यानुषंगाने महावितरणच्या बारामती येथील भरारी पथकानं डिसेंबर महिन्यात तपासणी केली. तपासणी दरम्यान वीजमीटरचे सील तोडून फेरफार केल्याचं दिसून आलं. तेव्हा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप शितोळे यांच्या समक्ष पंचनामा करुन वीजमीटर तपासणीसाठी बारामती येथील चाचणी विभागात आणण्यात आलं. तिथेही शितोळे यांच्या समक्ष तपासणी केली. त्यानंतर ज्या कंपनीने ते वीजमीटर बनविलं आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधीला बोलवून मीटरचा 'एमआरआय' काढण्यात आला.
वीज मीटरचा 'एमआरआय' काढल्यानंतर सदर मीटरमध्ये 10 ऑगस्ट 2016 पासून 9 डिसेंबर 2021 पर्यंत म्हणजेच, मीटर ताब्यात घेईपर्यंत तब्बल 64 महिने वीजचोरी झाल्याचं निष्पन्न झालं. वीजचोरीच्या कालावधीत 24 लाख 75 हजार 168 इतका वीजवापर होणं अपेक्षित होते. परंतु, जादा वापराच्या काळात मीटर बंद करुन फक्त 16 लाख 15 हजार 69 इतकाच वीजवापर होऊ दिला. परिणामी 8 लाख 60 हजार 99 इतक्या युनिटची नोंद मीटरमध्ये झाली नाही. चोरी केलेल्या या युनिटपोटी 1 कोटी 33 लाख 78 हजार 620 आणि विद्युत कायद्यातील तरतुदींप्रमाणे तडजोड शुल्कापोटी 16 लाख 20 हजार असे 1 कोटी 49 लाख 98 हजार 620 रुपयांचे देयक ग्राहकाला देण्यात आलं. मात्र विहीत मुदतीत ग्राहकानं ही रक्कम भरली नसल्यानं प्रथम बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तो यवत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- जबरदस्त! सांगलीच्या सातवी पास पठ्ठ्याने 30 हजारात बनवली FORD 1930 मॉडेलची गाडी
- अमरावतीत विनापरवानगी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने वाद चिघळला
- Marathi Board on shops: राज्य सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा