Baramati daund rain updates: दौंड, बारामतीत आभाळ फाटल्यागत पाऊस, अजित पवार म्हणाले, वर्षातला निम्मा पाऊस एका दिवसात पडलाय
Baramati daund pune rain updates: पुणे जिल्ह्यात पावसाचा कहर! उपमुख्यमंत्री अजित पवार भल्या पहाटे बारामतीच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी.

Heavy Rain in Baramati: गेल्या अनेक वर्षांचे प्रचलित आडाखे मोडत राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती (Baramati Rains), दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बारामती तालुक्यात कधी नव्हे इतका पाऊस कोसळला आहे. अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गापर्यंत आले आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) सोमवारी पहाटेच या भागाच्या पाहणीसाठी बाहेर पडले आहेत. यावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बारामतीत झालेल्या पावसाची भीषणता सांगितली. (Heavy Rain in Maharashtra)
मी पुणे जिल्हाधिकारी आणि इतरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. दौंड आणि बारामती परिसरात प्रचंड पाऊस झाला आहे. निम्मा पाऊस एका दिवसात पडला आहे. बारामती तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 14 इंच इतकी आहे. त्यापैकी 7 इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यानंतर अजित पवार हे कान्हेरी आणि काटेवाडी गावाच्या दिशेने रवाना झाले. कन्हेरी गावात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा अजित पवारांना दाखवला. अजित पवार सध्या या संपूर्ण परिसरात नुकसानीचा आढावा घेत फिरत आहेत.
Baramati Rain: बारामतीत पावसामुळे दाणादाण, कॅनॉल फुटल्याने घरांमध्ये पाणी शिरले
बारामती तालुक्यात गेल्या 24 तासांत 87 मिलिमीटर पाऊस झाला. याठिकाणी वर्षात साधारणपणे 450 मिलिमीटर पाऊस तालुक्यात पाऊस पडतो. गेल्या 5 दिवसांत त्यापैकी 314 मिलिमीटर पाऊस पडला आहे. नीरा डावा कॅनॉल फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. तसेच पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांना पाणी शिरून फटका बसला आहे.
अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गावर आलं असून काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आलाय. या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला. या कालव्याची देखील अजित पवारांनी पाहणी केली. कालवा फुटल्याने याठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्गावर पाण्याखाली गेला आहे. इथं पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोव्हा कार वाहून गेलीये. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
Maharashtra Rain updates: माळशिरसमध्ये तुफान पाऊस, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
माळशिरस तालुक्यात झालेल्या पावसामुळे नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुरभावी येथे नीरा नदी पुलावर आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. आज पहाटे अडीचच्या सुमारास कुरभावी येथील एका रानात अडकलेल्या कुटुंबाला एनडीआरएफच्या टीमने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. याशिवाय माळीनगर जवळ असणाऱ्या संग्राम नगर येथून 15 ते 20 कुटुंबांना पहाटे हलविण्यात आले असून यांच्या घरात पाणी घुसले आहे. नीरा नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे माळशिरस तालुक्यातील 500 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा























