पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. तर, एक आरोपी फरार आहे. यानंतर शुभू लोणकर याच्या फेसबुक पोस्टवरुन बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला अटक केली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे दोघे सोशल मीडियाद्वारे काही वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडले गेले. बिश्नोई टोळीला हत्यारे पुरवल्याबद्दल शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. शुभम लोणकर त्यांच्या मुळ गावी होता तर प्रवीण लोणकरने पुण्यातील वारजे भागात डेअरी आणि किराणा विक्रीचे दुकान सुरू केले होते. शुभमच्या सांगण्यावरुन बाबा सिद्दिकींच्या हत्येत सहभागी असलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे एकामागोमाग हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पुण्यात येऊन राहिले. प्रवीण लोणकरने त्याचे दुकान असलेल्या वारजे भागातच एका भंगार विक्रेत्याकडे त्यांना काम मिळवून दिले होते. पुण्यात राहून अनेकदा त्यांचे मुंबईला येणे जाणे सुरु होते आणि सिद्दिकींच्या हत्येचा कट रचला जात होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुण्यातून त्यांचा मुक्काम मुंबईला हलवला होता.
शुभम लोणकरला लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आणि शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरुन फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती.त्याची बातमी एबीपी माझाने त्यावेळी दाखवली होती. त्या बातमीचा स्क्रीन शॉट प्रवीण लोणकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यावेळी शेअर केला होता.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगने पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या घडवून आणली होती . त्या प्रकरणात पंजाब पोलीसांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव , जुन्नर तालुक्यातील नवनाथ सुर्यवंशी आणि सिद्धेश कांबळे यांना अटक केली होती. हे तिघेही लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीच्या सोशल मीडियातील पोस्टमुळे प्रभावित होऊन बिश्नोई गॅंगशी जोडले गेले होते. तुरुंगात असलेला लॉरेन्स तर परदेशात असलेले त्याचे साथीदार अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे सोशल मीडियाचा उपयोग करुन नवीन तरुणांची टोळीत भरती करतात आणि त्यांच्याकडून हवा तो गुन्हा करवून घेतात.
देशाच्या वेगवेगळ्या भागातील अनेक तरुण बिश्नोई गॅंगचे सदस्य बनलेत ज्यांचे आधी कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारांना आवरणे आणि त्यांच्याकडून होणारे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि तपास यंत्रणांसमोर आहे. अंडरवर्लडच हे ऑनलाईन व्हर्जन आहे.
इतर बातम्या :
मोठी बातमी! झिशान सिद्दीकीलाही मारायचं होतं, पण वाचला; बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचा गौप्यस्फोट