पिंपरी : एटीएम फोडीचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. बँका सुरक्षारक्षक नेमत नसल्याने या चोऱ्या घडत असल्याचं उघड होतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यात बँकांना पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मात्र बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानली. दुसरीकडे एटीएम चोरीच्या घटना थांबायचं नाव घेत नव्हत्या.
बँका आणि भरणा करणाऱ्या कंपन्या हलगर्जीपणाचा फायदा चोरट्यांकडून घेणं सुरूच होतं. खापर मात्र पोलिसांवर फुटू लागलं. म्हणूनच पोलिसांनी बँकांची गोची करायचा निर्णय घेतला. एटीएम चोरीचा पर्दाफाश केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद बँकांवर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न पोलीस आयुक्तांना विचारण्यात आला. यावर त्यांनी बैठकीत घडलेला प्रकार सांगितला. पण त्याचवेळी बँकांना अद्दल घडवण्यासाठी एक शक्कल लढवली आणि खातेदारांना आवाहन केलं. 'ज्या बँकेच्या एटीएम मशिनला सुरक्षारक्षक आणि सुरक्षेच्या उपाययोजना नसतील त्या बँकेतील खातं खातेदारांनी दुसऱ्या बँकेत वळवावे', असा सल्ला पोलिसांनी ग्राहकांना दिला. यामुळं त्या बँकांची खाती कमी होतील आणि त्यांना फटका बसेल. असं झाल्याशिवाय बँका चोरीच्या घटनांना गांभीर्याने घेणार नाहीत, असं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
बँकांकडून चोरीच्या घटनांना गांभीर्याने न घेण्याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे बँका एटीएम मशीनमध्ये रोकडचा भरणा करण्यासाठी खाजगी कंपनीला ठेका देते, त्यामुळे बँकेतून एटीएममध्ये रोकड घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांची असते. दुसरं म्हणजे बँकांनी विमा उतरवलेला असतो त्यामुळं रोकड चोरीस गेली तरी त्यांचं नुकसान होत नाही.
चोरीसाठी विमानाने यायचा म्होरक्या
दरम्यान आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी एटीएम फोडीचे सत्र मोडीस काढलं आहे. टोळीचा म्होरक्या विमानाने चोरीसाठी यायचा अन् जायचा. बँका आणि भरणा करणाऱ्या कंपन्यांची छोटीशी चूक या चोरीला कारणीभूत ठरायची. शहरात गेल्या सहा महिन्यात तब्बल पंधरा एटीएम मशीनवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. या घटनांना आळा बसावा म्हणून पोलिसांनी बँकांना सुरक्षेच्या उपाययोजना करायच्या सूचना केल्या. मात्र बँकांनी झोपेचं सोंग घेतलं. म्हणूनच पोलिसांनी खातेदारांना असं आवाहन करण्याची शक्कल लढवली आणि बँकांची झोप उडवली.
बँका आणि संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा
एटीएम मशीनमध्ये भरणा करताना बँका आणि संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा ही याला कारणीभूत ठरायचा. पैश्यांच्या बंडलला असणारे प्लास्टिकची दोरी डस्टबिनमध्ये टाकली जायची, यावरूनच मशीनमध्ये आजच रक्कम भरल्याचं स्पष्ट व्हायचं. टोळीचा म्होरक्या अझरुद्दीन हुसेन हा हरियाणाहून विमानाने यायचा. तर इतर साथीदार चारचाकीने. कटर आणि गॅस स्थानिक चोरटे द्यायचे. एटीएम मशीनची रोकड हातात पडली की इतर चोरटे चारचाकीने तर अझरुद्दीन मुंबईमधून विमानाने हरियाणाला जायचा.
'सुरक्षारक्षक नसेल तर खातं दुसऱ्या बँकेत वळवा', एटीएम चोरीच्या घटनांवर पोलिसांकडून बँकांची गोची
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
27 Feb 2020 08:44 PM (IST)
बँकांच्या हलगर्जीपणाचा चोरटे फायदा घेतायेत. पण बँकांनी इन्शुरन्स उतरवल्याने ते चोरीला गांभीर्याने घेत नव्हते. मात्र आता पोलिसांनी खातेदारांना असं आवाहन केल्याने शिवाय आरबीआयकडे ही बँकांची तक्रार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याने बँकांची मात्र गोची झाली आहे. त्यामुळं खातेदार कमी करायचे नसतील तर एटीएम मशिन्सना सुरक्षा देण्यापलीकडे आता बँकांपुढे पर्याय उरलेला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -