पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (25 फेब्रुवारी) रात्री उशिरा अटक केली. आमदार अनिल भोसले यांच्यासह बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ बॅंकेचे दोन अधिकारी एस व्ही जाधव आणि शैलेश भोसले यांनाही अटक करण्यात आली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत 71 कोटी 78 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.


शिवाजीराव सहकारी बॅंकेने नियमबाह्य पद्धतीने कर्जांचं वाटप केल्याचं आणि संचालकांच्या नातेवाईकांनाच कर्ज दिल्याचं उघड झाल्यावर, रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली होती. अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानपरिदषदेचे आमदार बनले होते. मात्र तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला होता.

अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या नगरसेविका आहेत. या घोटाळ्या प्रकरणी ज्या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये रेश्मा भोसले यांचाही समावेश आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतर्फे 71 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार असून या घोटाळ्याच्या व्याप्ती आणखी वाढू शकते. बॅंकेचे हजारो ठेवीदार त्यांचे पैसे अडकल्याने संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी करत होते. या सर्व आरोपींना आज (26 फेब्रुवारी) शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

ऑडिटमध्ये घोटाळा उघड
भारतीय रिझर्व्ह बँकने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे 2018-19 वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता, त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी असल्याचे आढळले. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आमदार भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीए योगेश लकडे यांनी याबाबत तक्रार दिली होती. भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण 14 शाखा असून, 16 हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.