एक्स्प्लोर
तिकोना गडावर माकडांमुळे आढळली प्राचीन गुहा
शेकडो वर्षांपासून नजरेआड असलेली ही गुहा माकडांमुळे नजरेस पडली. या गुहेत इतिहासाची साक्ष देणारा ठेवा असण्याची शक्यता दुर्ग प्रेमी व्यक्त करत आहेत.
पुणे: पुण्याच्या तिकोना गडावर एक प्राचीन गुहा आढळली आहे. शेकडो वर्षांपासून नजरेआड असलेली ही गुहा माकडांमुळे नजरेस पडली. या गुहेत इतिहासाची साक्ष देणारा ठेवा असण्याची शक्यता दुर्ग प्रेमी व्यक्त करत आहेत.
सह्याद्रीच्या पर्वत रांगात वसलेला, समुद्र सपाटीपासून साडे तीन हजार फूट उंचीवर असलेला, त्रिकोणी आकारातला तिकोना गड. पुण्यातील निसर्गाने नटलेल्या लोणावळा आणि तुंग गडालगतचं विलोभनीय दृश्य तिकोना गडाच्या सौंदर्याची साक्ष देतं. त्यातच गडावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर असल्यानं इथे भक्तीची सादही घेता येते. त्यातच आता भर पडली आहे ती एका प्राचीन गुहेची. शेकडो वर्षांपासून नजरेआड असलेली ही गुहा समोर येण्याला माकडं कारणीभूत ठरली आहेत.
गडाच्या पायथ्याशी राहून पर्यटकांसाठी चहा नाश्त्याचा व्यवसाय करणाऱ्या गुरुदास मोहळ, हा आपलं दुकान मांडून बसला होता. मात्र त्याचं साहित्य माकडांनी पळवून नेलं. गुरुदासने मग माकडांचा पाठलाग केला. माकडं ज्या ठिकाणी गेली ती एक गुहा होती. गडाची इतंभूत माहिती असलेल्या गुरुदास मोहळला ही गुहा प्रथमच दिसली होती. त्याने दुर्गप्रेमींना ही माहिती दिल्यानंतर ही पुरातन गुहा समोर आली.
गडाच्या कातळकडेवरील हा ठेवा जनतेसमोर आणण्यासाठी दिनेश बोडके थेट ड्रोन घेऊन गडावर दाखल झाला, मग दुर्गप्रेमींनी अवघड चढण सर केली. तिथं पोहोचताच गुहेत प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग असल्याचं दिसलं. गुहेत प्रवेश करताच मोठ्या प्रमाणात इथे खापरांचे तुकडे आढळले. तर उजव्या बाजूस अजून एक छोटी गुहा दिसली. तिच्या आत जायला, खूपच छोटा मार्ग आहे. त्यामुळं तिथं झोपूनच प्रवेश करता येऊ शकतो. या छोट्या गुहेत इतिहासाची साक्ष देणारा ठेवा असू शकतो.
या गडकोटांमध्ये अजूनही असे रहस्य उलगडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या दरीच्या उतारावर आढळलेल्या या मोठ्या गुहेचा इतिहासात कशासाठी वापर केला जात असावा? त्यातील खापरे कोणत्या युगातील असावीत? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ज्ञाच्या शोधात याचा सुगावा लागेलच, पण हा ठेवा जपण्यासाठी याचं संवर्धन होणं तितकंच महत्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement