Rickshaw Strike : रिक्षाचालकांनो 12 डिसेंबरला आंदोलन करु नका; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Rickshaw Strike : पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षाचालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
![Rickshaw Strike : रिक्षाचालकांनो 12 डिसेंबरला आंदोलन करु नका; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन Rickshaw Strike in Pune District Collector Appeal to Rickshaw drivers don't protest on December 12 Rickshaw Strike : रिक्षाचालकांनो 12 डिसेंबरला आंदोलन करु नका; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/4bfbf818390cccc57ba64270cc6287441670565979538442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rickshaw Strike : राज्यात बेकायदेशिररित्या (rickshaw) आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी (Bike Taxi) ॲपवर (App) बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षाचालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन (Protest) करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. त्यामुळे रिक्षाचालक कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
बाईक टॅक्सी अॅपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या समितीच्या सूचना
रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकांच्या न्याय मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गठित समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपायुक्त (सायबर शाखा), पोलीस उपायुक्त (वाहतूक), पोलीस उपायुक्त (गुन्हे) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने 7 डिसेंबरला झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.
आंदोलनामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होईल : जिल्हाधिकारी
जिल्हा प्रशासनाने रिक्षाचालकांच्या न्याय मागण्यांबाबत नेहमीच सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी ॲप चालवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरुच असून ॲपवर बंदी घालण्याबाबत राज्याच्या सायबर शाखेकडे पोलीस उपायुक्तांमार्फत पाठपुरवा करण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता रिक्षाचालकांनी आंदोलन करणे उचित होणार नाही, अशा आंदोलनामुळे नागरिकांची अधिक प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनावर रिक्षाचालक काय भूमिका घेणार?
रिक्षाचालकांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. शिवाय रिक्षाचालकांच्या समस्यांबाबतही प्रशासन संवेदनशीलतेने निर्णय घेत असते. स्वत: पालकमंत्र्यांनीही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडेदेखील बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. हे लक्षात घेता रिक्षाचालकांनी आंदोलन करु नये आणि यावेळी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. आरटीओसमोर शेकडो रिक्षाचालक एकत्र येत आंदोलन केलं होतं. यावेळी बाईक टॅक्सी चालकाला मारहाण करण्यात आली होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनावर रिक्षाचालक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)