Ram Akshata Kalash In Dublin : पुण्याच्या पठ्ठ्यांनी मंगल अक्षता कलश थेट Dublin ला नेला; आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार रामाच्या कलशाचं दर्शन!
महाराष्ट्र मंडळ आयर्लंड आणि काही पुण्यातील स्वयंसेवकांनी श्रीराम मंगल अक्षता कलश डब्लिन आयर्लंडमध्ये नेला आहे आणि संपूर्ण आयर्लंड आणि इंग्लंडमधील हिंदू भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करून दिला.
Ram Akshata Kalash In Dublin : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या (Ayodhya Ram Mandir) राम मंदिर लोकार्पणानिमित्त तसेच प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनानिमित्त श्री राम मंदिर अयोध्या ट्रस्ट यांच्यातर्फे संपूर्ण भारतात मंगल अक्षता कलश आणि अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे. याचंच औचित्य साधून महाराष्ट्र मंडळ आयर्लंड आणि काही पुण्यातील स्वयंसेवकांनी श्रीराम मंगल अक्षता कलश डब्लिन आयर्लंडमध्ये नेला आहे आणि संपूर्ण आयर्लंड आणि इंग्लंडमधील हिंदू भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करून दिला.
आयर्लंड आणि इंग्लंड येथे हा अक्षतांचा कलश घरोघरी वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र मंडळ आयर्लंड यांनी 200 किलो अक्षता तयार करून जवळपास 5000 घरी या अक्षतांचे वाटप करणार आहे. अक्षतांचे वाटप पुढील आठवड्यापासून म्हणजेच 15 जानेवारीपासून ते 20 जानेवारीपर्यंत होणार आहे.तसेच 21 जानेवारी रोजी महाराष्ट्र मंडळ आयर्लंडतर्फे या मंगल अक्षता कलशाचे पूजन आणि अभिषेक भारताचे राजदूत(indian ambassador) श्री अखिलेश मिश्रा आणि आयर्लंड येथील काही राजकीय नेते यांच्या उपस्थितीत वेदिक हिंदू कल्चरल सेंटर आयर्लंड येथे करण्यात येणार आहे.
जवळपास 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पणानिमित्त आयर्लंड येथे 2000 हिंदू भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन महाराष्ट्र मंडळ आयर्लंड तर्फे 21 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंड येथील हिंदू भाविक भारताबाहेर राहूनसुद्धा आयोध्या येथील राम मंदिर पूजेची अनुभूती VHCCI येथे घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी आयर्लंड आणि इंग्लंड मधील हिंदू भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारताबाहेर कलश घेऊन जाण्याचा हा असा आगळावेगळा उपक्रम महाराष्ट्र मंडळ आयर्लंडच्या माध्यमातून हिंदू भाविकांना अनुभवता येणार आहे.
आम्ही भारतात नाही आहोत भारतातील हा मोठा सण आहे. रामाच्या प्रत्येक भक्ताने अनेक वर्ष या भव्यदिव्य राम मंदिराची वाट बघितली आज खऱ्या अर्थाने राम मंदिर तयार झालं आहे. हा दिमाखदार सोहळा आम्ही सगळे दुसऱ्या देशातून अनुभवणार आहोत. बाहेर देशात कामानिमित्त आलो असलो तरीही आपल्या देशाची संस्कृती आणि रामाची भक्ती कधीही न विसरण्यासारखी आहे. राम आमच्या मनात आहे. त्यामुळे भारताबाहेरही आम्ही रामाचं स्वागत करत असल्याच्या भावना आदित्य कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाची बातमी-