(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, दगडूशेठ मंदिरात शिरलं पाणी
पुण्यात (Pune) परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं.
Pune Rain : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे. पुण्यात (Pune) परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारापर्यंत पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पाणी लागलं आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे.
राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांचा चांगलीच धावपळ झाली. अनेक भागात पाणी शिरलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पुण्यातील या भागात शिरलं पाणी
येवलेवाडी स्मशानभूमीजवळ
सुखसागर नगर, अंबामाता मंदिर
कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड
रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ
सुखसागर नगर, डॉल्फिन चौक
बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर
हडपसर, गाडीतळ
या वरील ठिकाणी पाणी शिरलं आहे. त्यामुळं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तर रमणा गणपतीजवळ पर्वतीमध्ये एका ठिकाणी भिंतीचा भाग पडल्याची घटना घडली आहे. तर हडपसरमध्ये आकाशवाणीजवळ झाड पडल्याची घटना घडली आहे. दरम्यान, शिवाजीनगर परिसरात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोंढवा खुर्द भाजी मंडई येथे एका ठिकाणी पाण्यात 7 नागरिक अडकले होते. यामध्ये 5 मोठे नागरिक आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. त्यांना रश्शीच्या साह्यानं सुखरुप बाहेर काढलं आहे. मंगळवार पेठेतही पाणी शिरलं होतं. सदा आनंदनगरमधून पाच जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. यामध्ये 3 लहान मुली 1 महिला 1 पुरुष होते.
पुण्यात आजही पावसाची शक्यता
दोन वर्षांनी यावर्षी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होणार असल्याने सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, याच काही दिवसात पुण्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारपर्यंत (16 ऑक्टोबर) महाराष्ट्रात फारसं ढगांचं आवरण नव्हतं. मात्र 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर नाही तर दक्षिण भागावर ढग दाटले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात आर्द्रतेची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आणि 17 ऑक्टोबरपासून पश्चिम-वायव्य दिशेच्या हालचालींसह कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये विकसित झाल्यामुळे राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वरच्या हवेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यासह राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.