हेल्मेटसक्तीची कारवाई, पुणेकरांकडून लाखोंचा दंड वसूल
पुणे पोलिसांनी कारवाईत तीन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. पुढे ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

पुणे : पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेला विरोध झुगारुन पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तब्बल 7 हजार 490 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईतून पुणे पोलिसांनी तीन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. पुढे ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईचा धसका घेत पुणेकरांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.
पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केला आहे. हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकर 3 जानेवारीला विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी रॅली काढून आपलं विरोध प्रदर्शन करणार आहेत. रॅलीनंतर पुणे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना निवेदन दिले जाणार आहे. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच म्हणणं आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन पुणेकर करत असून, हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी मागणी समितीने केली.
Before You Go
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव





















