बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. बारामती मतदारसंघात काही करुन पवार कुटुंबीयांचा पराभव करायचा, असा विडा भाजपने (BJP) फार पूर्वीच उचलला होता. अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील भाजपसोबत गेल्याने बारामतीची लढाई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासाठी कधी नव्हे इतकी अवघड असेल. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरु शकतात, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.  सुनेत्रा काकी बारामतीमधून सुप्रिया ताईंच्या विरोधात उतरतील, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.


युगेंद्र पवार यांनी बुधवारी शरद पवार गटाच्या बारामती येथील कार्यालयाला भेट दिली. ते याठिकाणी येण्यापूर्वी युगेंद्र पवार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, मी याठिकाणी पक्ष कार्यालय पाहण्यासाठी आलो असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले. माझ्या याठिकाणी येण्याची इतकी चर्चा होईल, असे वाटले नव्हते. पूर्वीपासून मी बारामतीमध्ये काम करत आलो आहे. आज मी पक्षकार्यालयाला फक्त भेट देण्यासाठी आलोय. मी ४ दिवस बारामतीत असतो. मुंबईला जाण्यापूर्वी याठिकाणी यावे, असे मला वाटल्याने मी पक्षाच्या कार्यालयात आलो. परंतु, माझ्या बारामतीमधील मित्रांनी याठिकाणी गर्दी केल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले.


साहेब सांगतील त्या उमेदवारासाठी प्रचार करणार: युगेंद्र पवार


सध्याचे राजकारण चांगले नाही, हे सर्व पाहून वाईट वाटते. हे राजकारण मला अजिबात आवडत नाही. शेवटी हे माझं कुटंब आहे, राजकारण हा वेगळा विषय आहे. हे सगळं घडायला नको होतं. मी बारामतीमध्ये साहेब सांगतील त्या उमेदवारासाठी प्रचार करेन. या सगळ्यात माझी अडचण होत आहे. सुनेत्रा काकी ताईंविरोधात लढतील, असे मला वाटत नाही. मी कोणाचा विरोध करायचा नाही म्हणून नव्हे तर शरद पवार साहेबांना साथ देण्यासाठी आलो आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


शिरुरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात अजितदादा पार्थ पवारांना उतरवणार? रोहित पवार नेमकं काय म्हणाले 


सख्ख्या पुतण्याने अजित पवारांची साथ सोडली, शरद पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले...