Sanjay Raut PC : सरकारने 10 टक्के मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा फसवणुकीचा प्रकार केल्याची प्रतिक्रिया शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हटलं की, 'सरकारने 10 टक्के आरक्षणाचा फसवणुकीचा प्रकार केला, तो मराठा समाजाला मान्य नाही. त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली.' असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विशेष अधिवेशनात मंजूर केला आहे. यानुसार, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, याला मनोज जरांगे पाटलांसह मराठा समाजाने याचा विरोध केला आहे.
'मराठा समाजाचं समाधान करण्यात सरकार अपयशी'
संजय राऊतांनी पुढे म्हटलं की, ''सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत उद्या राज्याता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली, तर, सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहे का, हा प्रश्न असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. मंत्री रस्त्यावर नाचतायतच आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे, मराठा समाज अस्वस्थ आहे, असं नाचून प्रश्न सुटणार का'', असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.
भाजपचा फसवाफसवीचा खेळ
भाजपवर निशाणा साधत संजय राऊतांनी म्हटलं की, ''भाजपचा फसवाफसवीचा खेळ आहे. ही फसवाफसवी मराठा आरक्षणापासून ते चंडीगड महापौर निवडणुकीपर्यंत सर्वत्र देशात फसवाफसवी सुरु आहे. भारतीय जनता पक्ष फसवाफसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. जरांगेनी बैठक बोलावली असून ते आंदोलनाची पुढची दिशा सांगतील.''
शेतकऱ्यांचे मुडदे पडले तरी चालतील, अशी सरकारची भूमिका
शेतकरी आंदोनाबाबतही संजय राऊतांनी विविध मुद्दे मांडले आहे. ''देशातील राज्यानुसार, शेतकऱ्यांची उत्पादनं वेगळी आहेत. अशावेळी देशातील शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी सीमापार केल्यास त्यांना गोळ्या झाडण्याचे सरकारचे आदेश आहेत. शेतकऱ्यांचे मुडदे पडले तरी चालतील, पण शेतकऱ्यांना एमएसपी देण्यासाठी सरकार तिजोरीत हात घालणार नाही. सरकारकडे इलेक्ट्रॉल बाँडच्या रुपाने भरपूर पैसे भाजपकडे आहे. पीएम फंडामध्ये हजारो कोटी आहेत, अदानींना देण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत. पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे सव्वा दोन कोटी देण्यासाठी सरकारची कोणतीही तरतूद करण्याची तयारी नाही'', असं राऊतांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल सुरुच
देशातच्या शेतकऱ्यांनी विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांना पाठींबा द्यावा. महाराष्ट्र आणि पंजाब हे कृषी प्रधान राज्य, त्यांच्या उत्पादनावर देशाचं पोट भरतंय पण त्यांचीच फसवणूक होतेय. देशातील शेतकरी नेत्यांनी चर्चा करायला हवी. देशातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल सुरु असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.