कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही दरी निर्माण झाली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे वगळता राजकारणाशी संबंधित नसलेल्या पवार कुटुंबीयांपैकी कोणीही अद्याप या सगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलेले नाही. अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे बुधवारी शरद पवार गटात प्रवेश करतील. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने अजितदादांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा आहे. परंतु, खुद्द शरद पवार यांनाच या गोष्टीची कल्पना नसल्याचे दिसून आले.


शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवारांना युगेंद्र पवार यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. युगेंद्र पवार आधी अजित पवार गटात होते, आता ते तुमच्याकडे येताहेत, तुम्हाला काय वाटते, असे पवारांना विचारण्यात आले. यावर शरद पवारांनी मिश्कीलपणे भाष्य केले. मुळात युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत, हेच मला माहिती नव्हते. ते व्यावसायिक आहेत. त्यांचा स्वत:चा मोठा व्यवसाय आहे. ते अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र हे अमेरिकेतून शिकून आलेले आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.


कोण आहेत युगेंद्र पवार?


युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. आतापर्यंत ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात.


माझे कुटुंबीय सोडून सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील: अजित पवार


काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील भाषण करताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. बारामतीच्या निवडणुकीवेळी माझे कुटुंबीय सोडून सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील. तेव्हा तुम्ही मला एकटं टाकू नका. तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेने निर्णय घेऊ शकतो, अशी भावनिक साद अजित पवारांनी कार्यकर्त्यांना घातली होती. 


आणखी वाचा


ती एक गोष्ट घडल्यानंतर अशोक चव्हाण काँग्रेस सोडतील, याचा अंदाज आला होता: शरद पवार