Ratnagiri Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी : गुहागरच्या श्रूंगारतळीतल्या सभेमध्ये रत्नागिरी- शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले होते की, बाळासाहेबांनी सांगितलं होतं मला नातू तू ना मैं... यातील नातू म्हणजे, विनय नातू. रामदास कदमांच्या याच टीकेला आता खुद्द माजी आमदार विनय नातू यांनी उत्तर दिलं आहे. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला कात्रजचा घाट दाखवला, रामदास कदमांनी केलेल्या टीकेला विनय नातूंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच, विनय नातूंनी 2009 सालचा घटनाक्रम सविस्तरपणे सर्वांसमोर मांडला. 


माजी आमदार विनय नातू म्हणाले की, "युतीच्या वाटपात शिवसेनें ही जागा हट्टानं मागून घेतली होती. त्याच्या उपाययोजनांची जबाबदारी शिवसेनेचीच होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं होतं की, प्रत्यक्ष विनय नातूंची भेट घ्या. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. जर तुमच्या चर्चेत विनय नातूंना पटलं नाहीतर मला फोन लावून द्या, मी स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलीन. पण तुम्ही त्यांची एकदा भेट घ्या, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. तुम्ही तसं ठरवलंही होतं, कार्यकर्त्यांनीही तुम्हाला सांगितलं होतं."


"मला भेटण्यासाठी खेडमधून निघालातही लोटेपर्यंत आलात आणि तिथे काही कार्यकर्त्यांनी तुमची एक स्वतंत्र बैठक घेतली. आपले जिल्हाप्रमुख मार्गताम्हाने माझ्या गावात थांबून होते, कारण त्यांनी माझ्याकडे येऊन भेट घेतली होती. तसेच, आमच्या गावातील साक्षीदार जे आता हयात नाहीत, त्यांच्या घरात तुमचे जिल्हाप्रमुख तब्बल तीन ते चार तास वाट पाहात होते.", असं विनय नातू म्हणाले. 


"तीन ते चार तासांनी मात्र तुमचे जिल्हाप्रमुख भाजपच्या कार्यकर्त्यांना थांबवू शकले नाही. तोपर्यंत तुम्ही लोटे येथेच होतात. काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला कात्रजचा घाट दाखवला, तुम्हाला वेगळीच दिशा दाखवली आणि त्यामुळेच 2009 चा इतिहास घडला. या घटनेच्या काही घडामोडी लोकांना माहिती होत्या. पण हा संपूर्ण घटनाक्रम लोकांना माहीत असला पाहिजे, त्यामुळेच मी सांगितला. याची सुरुवात तुम्ही केली.", असं विनय नातू म्हणाले. तसेच, तुम्हाला परशुराम घाट उतरून गुहाघरला जाता येतं, असं सांगितलं असतं आणि चुकीचा कात्रजचा घाट दाखवला नसता, तर आज ही वेळ आलीच नसती, असं विनय नातू म्हणाले.