Vijay Shivtare on Ajit Pawar : पुणे : विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पवार कुटुंबीयांविरोधात जणू एल्गारच पुकारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी प्रतिष्ठेची लढत चर्चेत असतानाच दुसरीकडे शिंदेंच्या एका माजी आमदारानं अजित पवार आणि एकंदरीतच पवार कुटुंबीयांविरोधात शड्डू ठोकला आहे.


बारामती लोकसभेला (Baramati Lok Sabha Election 2024) अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. एवढंच नाहीतर बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचंही शिवतारेंनी जाहीर केलं आहे. 


माजी आमदार विजय शिवतारे म्हणाले की, "बारामती मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही, देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे आणि मालकी कोणाची नाहीये. सहा विधानसभेचे मतदार संघ आहेत आणि म्हणून पवार पवार करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून आपण लढलं पाहिजे. विशेषत: अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता, तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक नव्हतं परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस होतो, मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली. स्टेन टाकल्या फेल झालं आणि मी संपूर्ण प्रचार अॅम्बुलन्समधून केला." 


अजित पवारांची गुर्मी, उर्मटपणा तसाच होता : शिवतारे 


"मरायला लागलेला आहे, तर कशाला निवडणूक लढवतोय. तुम्ही खोटं बोलतायत, असंही म्हणाले. पण लोकांची साथ हाती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं काम. माझी गाडी, मग ती कोणत्या कंपनीची इतक्या खालच्या थराला अजित पवार आले. तू पुढे कसा निवडून येतो, तेच मी पाहतो. महाराष्ट्राभरात मी कोणाला पाडायचं ठरवलं, तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि पाडतो म्हणजे पाडतोच, असंही म्हणालेले. राजकारणात कोणलाही निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी, निवडून आणणार म्हणजे आणणारच. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो काढी ओढायला, पण गाव वसवायला अनेक हात लागतात, त्यामुळे अशी उर्मट भाषा त्यांनी केलेली. म्हणूनच आज त्यांच्या उर्मट भाषेसाठी मी त्यांना माफ केलं. ते महायुतीत आल्यानंतर भेटून मी त्यांचा सत्कारही केला. पण पुढचे सहा ते सात महिने त्यांची गुरमी तशीच राहिली.", असं विजय शिवतारे म्हणाले. 


"त्यांना मी माफ केले होते, महायुती झाल्यानंतर. पण त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाहीत असे लोकांनी सांगितले. पवारांच्या विरोधातली मते आहेत. लोकांचा घात होतोय असं कळले.", असं शिवतारे म्हणाले. 


विजय शिवतारे म्हणाले की, "लोक म्हणायला लागले, सुनेत्रा आणि सुप्रिया आहेत. पण अजित पवार  उर्मट आहेत, म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करु असे लोक म्हणायला लागले. लोक म्हणाले, एका बाजूला एक लांडगा आहे आणि एक वाघ आहे तर कुठेतरी जावंच लागेल. त्यापेक्षा सुप्रिया सुळेंना देऊ अशी लोकांची भावना आहे." 


बारामतीत  6, 80,000 मतदान पवारांच्या समर्थनार्थ, तर 5 लाख 80 हजार मतदान विरोधात : शिवतारे 


"बारामतीत  680,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे, पण 5 लाख 80 हजार मतदान हे विरोधात आहे. लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असा हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे, ते अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल, तर आपल्लाया आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल, तर मतदान करावं लागेल. आणि अंबानींना एक मत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा लोकशाहीमध्ये तेवढाच मताचा अधिकार आहे.", असं विजय शिवतारे म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Vijay Shivtare : मी महायुतीच्या विरोधात नाही, पण इथली लढाई वेगळी, शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम