नागपूर : अखेर गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेला भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा मंत्रिपदाचा वनवास संपुष्टात आला आहे. राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे संपन्न होत आहे. त्यासाठी, नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूर येथील विधानभवन परिसरात होत असून मंत्रिपदासाठी आमदारांना फोन करून सांगण्यात येत आहे. भाजप नेत्या (BJP) आणि आमदार पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिपदासाठी वरिष्ठांचा फोन आला असून त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. मी मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मला ही संधी मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. 2014 मध्ये मी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होती. आता, पुन्हा एकदा संधी मिळत आहे, अशा शब्दात भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हिवाळी अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने सध्या सर्वच आमदार नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे, मंत्रिपदासाठी फोन आल्याबद्दल नागपूरमधूनच पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. मी मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मला ही संधी मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आहे. 2014 मध्ये मी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होती. आता, पुन्हा एकदा संधी मिळत आहे, असे पंकजा यांनी म्हटले.
दरम्यान, गेल्या 5 वर्षात पंकजा मुंडे या विधिमंडळ आणि सत्तेपासून दूर होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत होती. मात्र, भाजपने त्यांना विधानपरिषदेवर संधी न देता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र, लोकसभा निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकांची निराशा झाली होती. पण, लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसा करताना भाजपने मराठवाड्यातील नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांना विधांपरिषदेवर संधी दिली. विधांपरिषदेवर संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. त्यात, भाजपने तब्बल 132 जागांवर उमेदवार जिंकत मोठा विजय मिळवला. त्यामुळे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपने त्यांचा सन्मान ठेवला आहे. तर, पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, त्यांच्या समर्थकांनीही जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे.