Devenra Fadnavis In Nagpur : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज (15 डिसेंबरला) प्रथमच नागपुरात येत आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या स्वागतासाठी नागपूर नागरी सज्ज झाली आहे. तर भाजप आणि महायुतीकडून शहरात ठिकठिकाणी स्वागताचे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. अशातच देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासह त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सध्या प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस याच त्रिकोणी पार्कचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नितीन गडकरी स्वतः विमानतळावर उपस्थित
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज पहिलं नागपूर आगमन होत आहे. यावेळी भाजपच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागता वेळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान गडकरी रॅलीमध्ये सहभागी होतील की नाही हे अजून स्पष्ट नाही.
विशेष म्हणजे राजकारणात देवेंद्र फडणवीस हे गडकरी यांचे जूनियर आहे. फडणवीस ही नेहमीच गडकरींना माझे मार्गदर्शक आणि नेते असल्याचे संबोधतात. राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रसंगी सल्ला घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या घरी जात असतात. निवडणुकीच्या वेळेलाही दोन वेळेला फडणवीस गडकरींच्या घरी गेले होते. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही देवेंद्र फडणवीस यांचा औक्षण गडकरींच्या घरी झालं होतं. मात्र आज तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नागपुरात येत असताना गडकरी मोठेपणा दाखवत त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तयार करण्यात आला विशेष रथ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात आगमन झाल्यानंतर ते रॅलीचे स्वरूपात विमानतळ ते लक्ष्मी भुवन चौकापर्यंत जाणार आहे. रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस एका खुल्या रथावर स्वार होऊन लोकांचे अभिवादन स्वीकार करतील. यासाठी भाजपच्या वतीने एक विशेष रथ तयार करण्यात आला आहे. खुल्या ट्रकवर विशेष शिडी लावून एक विशेष मंच ही तयार करण्यात आला आहे. त्यावर मुख्यमंत्री उभे राहून वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करत लोकांचा अभिवादन स्वीकारतील.
हे ही वाचा