Yavatmal News : भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्याच अनुषंगाने आज त्या यवतमाळमध्ये (Yavatmal) आल्या होत्या. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर मात्र चित्रा वाघ प्रचंड भडकल्याचं पाहायला मिळालं.
तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं आहे का, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला. त्यावर चित्रा वाघ यांनी सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारु नका. तुम्ही न्यायाधीश आहात का? माझा लढा सुरु आहे, असं म्हणत, अशा पत्रकारांना बोलावू नका असं नमूद केलं.
पत्रकाराचा नेमका प्रश्न काय होता?
माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनीच संजय राठोड यांना क्लीन चीट दिली आहे. त्यानंतर शिंदे भाजप सरकार स्थापन झालं. संजय राठोड यांना क्लीन चिट असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. असे असताना तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचे आयुष्य बर्बाद झाले नाही का असा प्रश्न स्थानिक एका वरिष्ठ पत्रकारांकडून विचारताच चित्रा वाघ भडकल्या. आपण न्याय व्यवस्था आहात का? पूजा चव्हाण प्रकरणात मी न्यायालयात गेले आहे. मला शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संबंधित पत्रकाराला सुपारीबाज संबोधले.
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ
बीड जिल्ह्यातील एका 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. ही तरुणी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यातील वानवडी इथल्या हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. 7 फेब्रुवारीच्या रात्री तिने पुण्यातील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्र्याचा संबंध असल्याचं वृत्त समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ते नाव होतं, संजय राठोड यांचं. या प्रकरणी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे यावरुन राजकारण रंगलं होतं. त्यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. तसंच, संजय राऊत यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी महाविकास आघाडीत मंत्री असलेल्या संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची नाराजी
यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याने चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय राठोड यांना मंत्रिपद देणं दुर्दैवी असून त्यांच्याविरुद्धचा माझा लढा सुरुच राहिल असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. याबाबत त्यांनी ट्वीट केलं होतं.