Sushma Andhare Meets Sanjay Raut : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांना वर्कलोड आहे. त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाही, अशी टीका त्यांनी केली. तसंच अनिल परब यांचं घर लांब आहे. पण आधी मुंबईतील नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार, असा सवाल सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना विचारला. 


संजय राऊत यांची भेट ऊर्जा देणारी होती
संजय राऊत हे ज्येष्ठ नेते आहेत. मी वारंवार सांगते की या परिवारातली मी धाकटी लेक आहे. त्यामुळे त्यांना भेटण्याची उत्सुकता फार होती. कारण योगायोग असा होता की राऊतांवर कारवाई झाली आणि मी पक्षात आले. त्यांना जसे 102 दिवस झाले होते तसे मला पक्षात येऊन 102 दिवस झाले होते. लांब पल्ल्याच्या तोफेकडून काही टिप्स मिळतील का, मी विरोधकांवर आणखी कशा पद्धतीने तोफगोळे चालवू शकते यासाठी एका गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वाची फार ऊर्जा देणारी भेट होती, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी भेटीनंतर दिली. "संजय राऊत परत आल्यामुळे शिवसेनेची ऊर्जा, ताकद वाढली आहे. न्यायालयानेही संजय राऊत यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं मान्य केलं. आता सभागृहात यावर चर्चा व्हायला पाहिजे," अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली.


किरीट सोमय्यांवर हल्लाबोल
"जे लोक राऊतांच्या मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवाल्यांचा, गजरेवाल्यांचा हिशोब मागतात, ते लोक बिकेसीमधील मेळाव्यात कोट्यवधींचा चुराडा झाला त्याचा हिशोब कधी देणार आहे. मी किरीटभाऊंना वारंवार म्हणते की तुमचा गंडा बांधायला तयार आहे. मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे, पण मला दोन-तीन प्रश्नांची उत्तरं द्या. अनिल परबांचं घर लांब आहे, पण आधी मुंबईतील नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? तुम्ही इतरांना हिशेब विचारता तेव्हा भाजप आणि मित्र पक्षातील लोकांना हिशेब कशी विचारणार आहात? बीकेसीतील मेळाव्यात नोंदणीही न झालेल्या पक्षाचा खर्च कोणाच्या खात्यातून झाला, यावर किरीटभाऊ का बोलत नाहीत? तिसरा प्रश्न असा आहे की, प्रताप सरनाईक, भावना गवळी आणि यशवंत जाधव यांना सरकार स्थापन करण्यापूर्वी माफिया म्हणत होता, त्यांच्यावर एफआयआर कधी दाखल होणार आहे, हे सोमय्यांनी सांगावं?", असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना विचारले.


'देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपद दुसऱ्याकडे सोपवावं'
यावेळी बोलतना सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "कुठे काळं फासलं असेल, महिलांवर अत्याचार होत असतील किंवा कुठे महिलांबद्दल गरळ ओकली जाते या सगळ्या बाबींवर मी वारंवार देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारते. देवेंद्रजी गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्त्वात आहे का? देवेंद्रजींची अडचण ही आहे की त्यांच्यावर वर्कलोड खूप आहे. मला देवेंद्रभाऊंची फार काळजी आहे. बहिणी आहे मी त्यांची. सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद, गृहमंत्रीपद, एवढी खाती, उपमुख्यमंत्रीपद. माणसाने किती काम करायचं. त्यांनी वर्कलोड थोडा कमी केला पाहिजे. गृहमंत्रीपद त्यांना झेपत नाही हे लक्षात येतं, त्यांनी ते दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवलं पाहिजे. कारण त्यांच्या कारकीर्दीत पाचवेळा संसदरत्न प्राप्त केलेल्या महिलेविरोधात मंत्रीच गरळ ओकत असेल, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संभाजी भिडे असभ्य वर्तन करत असतील किंवा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून माझ्याबद्दल गुलाबराव पाटील बोलत असतील. त्यावर असं बोलू नये, इतक्या गुळगुळीत भाषेतील मखलाशी जर गृहमंत्री करत असतील तर याचा अर्थ सरळसरळ आहे की त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाही," असं अंधारे म्हणाल्या. 


भाजपकडून प्रेशर पॉलिटिक्स
"भाजपकडे आलं की फाईली बंद होतात, विषय संपतात, वाद संपतात. पण भाजपच्याविरोधात गेलं की फायली उघडतात, विषय उघतात, पुन्हा वाद सुरु होता. प्रताप सरनाईक तिकडे गेले की सगळे विषय बंद होतात. पण सरनाईकांनी मतदारसंघ देण्यास नकार दिला की पुन्हा ईडी त्यांच्या संपत्तीवर टाच आणते. हे नेमकं काय आहे. भाजपकडून प्रेशर पॉलिटिक्स सुरु आहे. द्वेषमूलक राजकारण आणि स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर थांबला पाहिजे," अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.  


एकनाथ भाऊंना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही 
शिंदे गटावर हल्लाबोल करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, "ती अजिबात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही. कारण बाळासाहेबांचा कुठलाही शिवसैनिक, कुठलाही आमदार महिलांबाबत अवमानकारक बोलू शकत नाही. अब्दुल सत्तार आणि गुलाब पाटील यांना जो सरंजामी माज आहे किंवा महिलांबद्दल जी भाषा ते वापरतात त्यावरुन ते बाळासाहेबांचे शिपाई म्हणवण्याच्या लायक नाहीत. दुसरी गोष्ट अशी की, आमदार आमच्या संपर्कात आहेत, अशा कंड्या पिकवणं बंद करा राव. एकनाथ भाऊ तुमची अशी अडचण आहे की, तुम्हालाच भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला तिथे जावंच लागेल, त्याशिवाय इलाजच नाही. संजय शिरसाट यांचं बघा, नंतर बाकीच्यांचं बोला. नाहीतर संजय शिरसाट सोडून जातील. माझ्या भावाला फसवलं. त्याला मंत्रिपद दिलं नाही, साधं उपनेतेपद दिलं नाही. वाईट वाटतं हो बहिण आहे हो मी." 


आता गेलेले भाऊ परत येणार
शिंदे गटातील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्या म्हणाल्या की, "आता भाऊ जाणार नाहीत. गेलेले भाऊ आता परत येणार आहेत. त्यातले दोन चार भाऊ जे आहेत ते आधीच आमच्या संपर्कात आहेत. ते येण्याच्या मार्गावर आहेत. त्या बिचाऱ्यांना पश्चाताप होतोय. त्यांची अडचण अशी आहे की, जाताना त्यांनी ज्या उड्या मारल्या होत्या किंवा त्यांनी जी गरळ ओकली होती, त्यामुळे त्यांना स्वत:ला कधीतरी वाईट वाटतं की आपण आपल्या हाताने परतीचे दोर कापले आहेत का? पण डोन्ट वरी मातोश्री अतिशय प्रेमळ आहे. मातोश्रीचं अंत:करण फार विशाल आहे. त्यामुळे सुबह का भुला देर रात को घर आए तो ठीक है उसके बारे में भी सोचेंगे."


VIDEO : Sushma Andhare UNCUT: संजय राऊत यांची भेट, फडणवीस - सोमय्यांवर हल्लाबोल; सुषमा अंधारे भाजपवर गरजल्या