Nagpur News : संजय राऊत यांनी काय बोलायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता फक्त त्यांना जामीन मिळाला आहे, यानंतर न्यायालयात भरपूर सबमिशन करावे लागतात. केवळ जामीन मिळाला तर जल्लोष करणे, आणि निर्दोष सुटलो असं वागणं बरोबर नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली.
ओबीसी आरक्षणावर विचारले असता बावनकुळे म्हणाले की, यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण दिलं आहे. एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर बांठीया आयोगाचा अहवाल दिला आणि आरक्षण मिळालं. केवळ 93 नगरपालिकांमध्ये आरक्षण नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ही तांत्रिक बाबींवर होणार आहे. या उर्वरित 93 नगरपालिकांमध्ये ही लवकरच आरक्षण मिळेल.
यावेळी 'वन नेशन वन इलेक्शन' यावर विचारले असता बावनकुळे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (One Nation One Election) यांनी एक देश एक निवडणूक या भूमिकेचे समर्थन केले आहे. राज्यातील अनेक पक्ष याच विचाराचे आहेत. मात्र या योजनेला सर्वपक्षीय एकमत मिळणे गरजेचे आहे.
...म्हणून उद्धव ठाकरे अनधिकृत बांधकाम काढू शकले नाही
अफजल खानाच्या कबरीला लागून अनधिकृत बांधकाम झालं असं गेल्या सरकारमध्ये अनेकांनी वारंवार सांगितले. या अतिक्रमणाविरोधात अनेक संघटनांनी विरोधही केला. यावर उद्धव ठाकरे यांची एकहाती सत्ता असती तर लगेच कारवाईही झाली असती. मात्र राज्यात तीन पक्षांचं सरकार होतं. म्हणून इच्छा असूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कारवाई करता आली नाही. त्याच्यावर कॉंग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) दबाव होता. त्यामुळे आता हे अनधिकृत बांधकाम तोंडल्याने राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) - देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचे अभिनंदन राज्यभरातून केले जात असल्याचे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आंदोलनाला वीस वर्षांनी यश!
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सांगलीतील माजी आमदार नितीन शिंदे यांच्या आंदोलनाला 20 वर्षांनी यश आलंय. नितीन शिंदे यांनी हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आंदोलन केलं होतं. 2001 साली चलो प्रतापगड अशी हाक देत त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलं होतं.
हेही वाचा