Chandrahar Patil: साहेब तुम्हाला वचन देतो, महाराष्ट्रात सगळ्यात पहिला निकाल सांगलीतून येईल; चंद्रहार पाटलांनी शड्डू ठोकला
Maharashtra Politics: मातोश्रीवर पक्षप्रवेश होताच चंद्रहार पाटलांनी दंड थोपटले, अब की बार चंद्रहार! चंद्रहार पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार ठरला.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे सांगलीतील संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. यावेळी ढोलताशांच्या आवाजाने आणि चंद्रहार पाटील (chandrahar Patil) यांच्या कार्यकर्त्यांच्या आवाजाने मातोश्रीचा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले. उमेदवारीचा निर्णय घेणारा मी कोण? आता सांगलीच्या जनतेनेच ठरवले असेल तर मी अडवणारा कोण?, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे चंद्रहार पाटील यांच्या सांगलतीली उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.
ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आज मला मनापासून आभार मानायचे आहेत की, एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारले. तुम्ही मला सांगली लोकसभेच्यादृष्टीने जो मान दिला, त्यासाठी मी आभारी आहे. तुम्ही एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करुन दाखवण्याची सवय आहे. महाराष्ट्रातील पहिला निकाल सांगलीतून असेल, एवढे वचन मी तुम्हाला देतो, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले.
अबकी बार चंद्रहार, पाच लाखांनी निवडून येणार; समर्थकांची घोषणाबाजी
चंद्रहार पाटील यांच्या मातोश्रीवरील पक्षप्रवेश सोहळ्याला त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. गाड्यांचा मोठा ताफा आणि कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी मातोश्रीवर पाहायला मिळाली. यावेळी चंद्रहार पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अबकी बार मोदी की हार, अबकी बार चंद्रहार, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील तब्बल 5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, अशी घोषणाबाजीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत केले. आजचा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांनी कुस्तीचे मैदान गाजवले आहे. ते कुस्तीच्या क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आहेत. आता सेनेच्या मशालीसोबत चंद्रहारची गदा असणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा