Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government) स्थापनेपासून मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आता हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Assembly Session) मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री असे एकूण 20 मंत्री आहेत. मात्र नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी तयारी करणाऱ्या प्रशासनाने रवीभवन आणि नागभवन परिसरात तब्बल 40 बंगले मंत्र्यांसाठी तयार केले आहेत. राज्यात सध्या वीस मंत्री असताना चाळीस बंगले तयार केले जात असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल का अशी शंका निर्माण झाली आहे.


रवीभवन आणि नागभवन परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या विषयावर कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. मात्र, दरवर्षीच्या हिवाळी अधिवेशनाप्रमाणे आम्ही मंत्र्यांच्या निवासाची सर्व व्यवस्था तयार करुन ठेवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


बंगल्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी सुरु
रवीभवन परिसरात एकूण 30 बंगले असून त्यापैकी सहा बंगले विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती यांच्यासाठी राखीव आहेत. उर्वरित 24 बंगले कॅबिनेट मंत्र्यांसाठी राखीव असतात. त्या सर्व बंगल्यामध्ये सध्या रंगरंगोटी करुन स्वच्छता केली जात आहे. छताची तसेच खिडकी, दाराच्या दुरुस्तीची कामे केली जात आहेत. अनेक ठिकाणी नवीन टाईल्स बसवल्या जात आहेत. जुनं फर्निचर बदललं जात आहे. 


त्याशिवाय जवळच्या नागभवन परिसरातही राज्यमंत्र्यांसाठीचे 16 बंगले असून तिथेही दुरुस्तीची काम केली जात आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी किंवा हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तयार ठेवलेल्या बंगल्यांमध्ये नवीन मंत्र्यांचा प्रवेश होईल का असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.


VIDEO : Nagpur : हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?



मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळ वाटप होणार?
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्याच आमदारांचं लक्ष लागलं आहे. पण शिंदे फडणवीस सरकारने वेगळीच रणनीती आखल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळांचं वाटप होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महामंडळं देऊन काही आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना खूश करण्याची शिंदे आणि फडणवीसांची रणनीती असल्याची रणनीती असल्याची चर्चा रंगत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर संभाव्य नाराजी दूर करण्याचे हे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.