Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पहिल्या टप्प्यात एक दिवसही पक्षाचा प्रचार केला नाही. राज्यात दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र या टप्प्यातही सोनिया गांधी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार करण्याची शक्यता कमी आहे. सानिया गांधी या काँग्रेसच्या 136 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिल्या आहेत. पण त्यांनी हिमाचल प्रदेशात एक दिवसही प्रचार केला नाही. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभांसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांनी एकाही निवडणूक सभेला संबोधित केलेले नाही.


काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'टाईम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, सोनियांनी जाहीर सभांना, विशेषतः निवडणूक रॅलींना संबोधित करणे बंद केले आहे. त्याचबरोबर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी एकाही निवडणूक सभेला संबोधित केले नाही. त्यांनी 11 एप्रिल 2019 रोजी रायबरेली येथील त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच माध्यमांशी संवाद साधला होता.


स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यामागचे कारण विचारले असता काँग्रेस नेत्याने सांगितले की, "प्रोटोकॉलमुळे त्यांचे नाव प्रत्येक वेळी समाविष्ट केले जाते. पक्षाच्या निवडणूक रॅलींना संबोधित करायचे की नाही, याचा निर्णय पूर्णपणे त्यांच्यावर आहे."  सोनिया गांधी यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी 14 डिसेंबर 2019 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेवटच्या जाहीर सभेला संबोधित केले होते. काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या 'भारत बचाओ रॅली'चा हा कार्यक्रम होता. यादी सोनिया गांधी यांनी मे 2016 मध्ये तीन सभांना संबोधित केले होते. त्यांनी 21 मे 2016 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्लीतील 'हम में हैं राजीव गांधी' रॅलीला संबोधित केले होते.


दरम्यन, सोनिया गांधी या 9 डिसेंबर रोजी 76 वर्षांच्या होणार असून त्यांची प्रकृती हल्ली ठीक नसते. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा आरंभ करण्यासाठी सोनिया गांधी वाराणसीला गेल्या होत्या. येथील विमानतळावर उतरल्यानंतर 2 ऑगस्ट 2016 रोजी त्यांना पहिल्यांदाच एका राजकीय कार्यक्रमात आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. सोनियांच्या जाहीर सभांना न येण्याचे कारण त्यांची खराब प्रकृती असल्याचे मानले जात आहे.