सोलापूर: राज्यात यंदा सर्वाधिक चर्चेत राहिला आणि अजूनही चर्चेत राहतोय तो मतदारसंघ म्हणजे माढा (Madha Lok Sabha Election). एकेकाळी राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसतंय. पण सुरुवातीला काहीसे माघार घेतलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) आता माढ्यामध्ये पुन्हा जोमाने फासे टाकायला सुरूवात केली आहे, आणि त्याला बळ मिळतंय ते अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबीयाचं. भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे आता शरद पवार गटात सामील होणार असून त्यांच्यामार्फत शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंबीयांनी पुन्हा एकदा माढ्याचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 


माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव माहिती होतं, आता धैर्यशील मोहिते पाटलांचंही नाव चर्चेत आलं आहे. 


कोण आहेत धैर्यशील मोहिते पाटील? 


जन्म 13 एप्रिल 1977 , वय 47 वर्षे 


शिक्षण - MBA 


धैर्यशील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे लहान बंधू राजसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव असून विजयदादांचे यांचे पुतणे आहेत. धैर्यशील यांचे वडील राजसिंह मोहिते पाटील हे प्रगतशील शेतकरी म्हणून महाराष्ट्राला परिचित असून ते पहिल्यापासून शेतीत रमले. सुरुवातीला शिवामृत दूध उत्पादक संघ अकलूज येथे त्यांनी चेअरमन म्हणून बरीच वर्षे काम केले. याकाळात ते महानंद येथे संचालक देखील होते. 


सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष आहेत. अफाट जनसंपर्क ही धैर्यशील यांची खरी ताकद असून जिल्हाभर केवळ भैय्या यांचे मित्र असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. 


धैर्यशील मोहितेंची राजकीय कारकीर्द 



  • 2005 साली धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 

  • यानंतर 2007 साली ते माळशिरस पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं.

  • 2012 साली सोलापूर जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर 2014 मध्ये जिल्हा परिषदमध्ये गटनेता अशा विविध पदावर त्यांनी काम केले. 

  • 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी अकलूज येथे भाजपमध्ये प्रवेश केला. 

  • त्यानंतर लगेच झालेल्या माढा लोकसभा निवडणुकीत भाजपाला 1 लाखाचे लीड मिळवून देऊन राष्ट्रवादीकडून जागा खेचून आणली. 

  • भाजपमध्ये काम करताना त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य करण्यात आले. पक्षीय जबाबदारी पार पडताना त्यांनी सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री पदावर काम केले. 


धैर्यशील मोहिते पाटलांनी आता हाती तुतारी घ्यायचं निश्चित केलं असून येत्या 14 एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा अकलूज येथील क्रीडासंकुल येथे शक्तिप्रदर्शनाने पक्ष प्रवेश होणार आहे. तर 16 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील. 


ही बातमी वाचा: