मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामुळे कांग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचं चित्र आहे. सांगली, भिवंडी पाठोपाठ मुंबईतील जागा वाटपामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते. एवढंच नाही तर मुंबई कांग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा वाद निर्माण झाल्याचंही दिसतंय. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी थेट हायकमांडकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यामुळे हा वाद आता थेट दिल्ली दरबारी गेलेला पाहायला मिळतोय.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची अंतिम जागा वाटपाची पत्रकार परिषद झाली आणि त्यातून काँग्रेसच्या नाराजीचा सूर स्पष्ट दिसू लागला. या सुरात वर्षा गायकवाड यांनी आपल्या नाराजीचा सूर लावून धरलाय. तो फक्त महाविकास आघाडीच नाही तर स्वपक्षीच्या नेत्यांच्या विरोधात ही आहे.
दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही
मुंबईमध्ये काँग्रेसला तीन जागांची अपेक्षा होती. त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईसाठी स्वतः वर्षा गायकवाड आग्रही होत्या. मात्र दक्षिण मध्य मुंबई जागाही ठाकरे गटाला देण्यात आली आणि दोनच जागांवर कांग्रेसला समाधान मानावं लागलं. मात्र कुठेतरी मुंबईच्या जागा मागण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते कमी पडले एवढंच नाही तर आपल्याला बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला.
मुंबईतील जागा वाटपाच्या संदर्भात मुंबई अध्यक्ष यांचा अधिकार असताना प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी यात हस्तक्षेप केल्याची तक्रारही वर्षा गायकवाड यांनी केली. त्यांनी दिल्लीमध्ये फोन करून के सी वेणुगोपाल यांना ही तक्रार केलीय.
मुंबईतील दोन जागांसाठी तयारी सुरू
मुंबईच्या या जागावाटपामध्ये आता उद्धव ठाकरे बदल करण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता या दोन जागांसाठी उमेदवारांची चाचणी करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये उत्तर मुंबईसाठी ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर उत्तर मध्य मुंबईसाठी नसीम खान आणि भाई जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्याचसोबत काही सेलेब्रिटी यांचीही चाचपणी सुरू आहे.
त्यामुळे अंतिम निर्णयासाठी मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी शुक्रवारी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. जर पक्षश्रेष्ठींनी यात काही बदल केला नाही तर या नावांवरती शिक्कामोर्तब करून मुंबई काँग्रेसला या प्रचाराला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीमध्ये काँग्रेस हाय कंमाड काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलय.
ही बातमी वाचा: