पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केलं. धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश, राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय याबाबत शरद पवारांनी भाष्य केलं. पत्रकारांनी राज ठाकरे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवारांनी मिश्कील उत्तर दिलं.
पत्रकारांनी राज ठाकरेंसदर्भात प्रश्न विचारलं असता शरद पवार म्हणाले की आतापर्यंत राज ठाकरेंनी तीन चार निर्णय गेल्या 10 ते 15 वर्षात घेतले होते. त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला आहे म्हणतात मात्र येत्या दोन चार दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले. राज ठाकरेंनी अनेकदा भाजपसंदर्भात कठोर शब्द वापरले. तर, काही वेळा त्यांना पाठिंबा दिला आहे. पत्रकारांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा अन्वयार्थ काय लावता असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी मी काय अन्वयार्थ लावणार असं म्हटलं. पत्रकारांनी राज ठाकरेंची भूमिका सामान्य माणसांना कळली नाही, असं म्हणत तुम्हाला तरी राज ठाकरे कळले का? असा प्रश्न विचारला यावर शरद पवारांनी मी पण सामान्य नागरिक आहे, असं म्हटलं.
शरद पवार पुढे म्हणाले की एकनाथ खडसे यांच्या बाबत टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. यातना सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना रिलीफ मिळत असेल त्याठिकाणी त्यांनी जावं अशी आमची भूमिका होती.
धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात येत आहेत. अतुल देशमुख यांचा आज प्रवेश होतोय. या सगळ्यांचे स्वागत असल्याचं शरद पवार म्हणाले. धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. पुणे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे हे देखील प्रवेश करणार आहेत. या सगळ्यांनी कुठलीही अट किंवा अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नाही. 1996 मध्ये बहुमत नसतांना सत्तेचा स्वीकार करणे मला योग्य वाटले नाही, असं शरद पवार म्हणाले.
आज कोणी भाजपसोबत गेलं का? मागे काय घडलं त्यांनंतर बरेच काही घडलं. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठी माझी सहमती होती हे म्हणण्याला आज काही अर्थ नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.