मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. काँग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी, असं वक्तव्य पटोले यांनी केलंय. यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांचाही पटोले यांनी समाचार घेतला.


भाजपला घाई झाली आहे, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. पूजाचे कुटुंबीय सुद्धा ही गोष्ट मान्य करत नाही, त्यामुळे जो काही निर्णय आहे तो चौकशीनंतर शिवसेना पक्षप्रमुख घेतील असा विश्वास असल्याचे नाना म्हणाले.


राजीनामा देतो पण..
राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.


विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार : नाना पटोले
विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आता काही आमदार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घेत नाहीत. पण हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे. निवडणूक या अधिवेशनात पण शकते जर कोरोनाची भीती कमी वाटली तर, असेही संकेत पटोले यांनी दिलेत. तर काँग्रेसच्या मंत्र्यांना निधी मिळत नाहीत अशा तक्रारी तुमच्या माध्यमातून माझ्या कानावर आल्या. पण त्या बाबतीत आम्ही जो काही दम द्यायचा तो दिला आहे. हा दम योग्य जागी पोहोचलेला आहे का? असा प्रश्न विचारल्यावर याचे उत्तर तुम्हाला याच अधिवेशनात मिळेल असेही नाना पटोले म्हणाले.