Sharad Pawar On BJP  : देशात आर्थिक संकट ओढावले असून, श्रीलंका, पाकिस्तानातल्या राजकीय अराजकतेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोट ठेवलं आहे. त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते, आणीबाणीनंतर जनतेनं इंदिरा गांधींचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर मोरारजी देसाई यांचं सरकार जनतेनी पाडलं, जनता सुजाण आहे, नेते चुकल्यावर धडा शिकवते असे शरद पवार म्हणाले. आणखी काय म्हणाले शरद पवार?


शरद पवारांकडून पुन्हा 'त्या' कवितेचं वाचन


महाराष्ट्र भाजपच्या (BJP) ट्विटर हँडलवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. यामध्ये शरद पवार यांनी हिंदू देवीदेवतांचा कशाप्रकारे अपमान केला, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी या भाषणात जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा उल्लेख केला होता. यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी जवाहर राठोड यांच्या कवितेचं वाचन करण्यात आलं. याच कविता वाचनावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती.  पवारांनी आज वाचलेल्या कवितेच्या माध्यमातून कष्टकरांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न राठोड यांनी केला असं म्हटलंय. 


संविधानाने देशाला एकसंध ठेवलं, शरद पवार म्हणाले...
शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, डॉ.बाबासाहेब यांनी लिहलेली राज्यघटना ही आपली जमेची बाजू आहे, तसेच बाबासाहेबांच्या याच घटनेमुळे देश एकसंघ आहे. संविधानाने देशाला एकसंध ठेवलं 


पुणे आणि साताऱ्यासाठी पुरंदरचा विमानतळ होणं गरजेचं


पुरंदरचा विमानतळ उपयुक्त, तो पूर्ण व्हावा, पुणे आणि साताऱ्यासाठी पुरंदरचा विमानतळ होणं गरजेचं आहे असे पवार यावेळी म्हणाले.


'पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!' भाजपकडून ट्विट


नुकतंच भाजपकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवारसाहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!'. आता या टीकेला शरद पवारांकडून पुन्हा तीच कविता वाचून प्रत्युत्तर दिले असल्याचं बोललं जातंय.