TMC Demands Bharat Ratna Or Rajya Sabha Seat For Vinesh Phogat : लागोपाठ तीन सामने जिंकत मोठ्या थाटात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) 50 किलो वजनी गटातील फायनल गाठणाऱ्या विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अपात्र घोषित करण्यात आलं. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विनेशला अपात्र घोषित केल्यानंतर संपूर्ण देशभरातून नाराजीचा सूर उमटला. तर, संसदेतही या प्रकरणावरुन गदारोळ झाला. त्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याप्रकरणी निवेदन सादर केलं. अशातच आता तृणमूल काँग्रेसकडून विनेशला भारतरत्न देण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, भारतरत्न द्या नाहीतर किमान राज्यसभेची खासदारकी तरी द्या, अशी मागणी तृणमूल काँग्रेसनं लावून धरली आहे. 


तृणमूल काँग्रेसनं (TMC) बुधवारी ज्येष्ठ कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी भारतरत्न किंवा राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या राज्यसभेच्या जागेची मागणी केली. 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. विनेश सुवर्णपदकापासून अवघ्या काहीच तासांच्या अंतरावर होती. 






पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेचं दुःखद असं वर्णन केलं आहे. विनेश फोगट भारताच्या 1.4 अब्जाहून अधिक लोकांसाठी चॅम्पियन आणि देशाचा अभिमान आहे, असं देखील सांगितलं आहे. 






तृणमूल काँग्रेसची नेमकी मागणी काय? 


टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "सरकार आणि विरोधकांनी एकमत करण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. एकतर कुस्तीपटू विनेश फोगाटला भारतरत्न द्यावं किंवा तिला राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नामांकित करावं. कारण तिनं कमालीची क्षमता दाखवली आहे, तिनं इतके संघर्ष केले आहेत की, कोणतंही पदक तिची खरी क्षमता दर्शवू शकत नाही."


महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रीजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील निषेधांमध्ये फोगाटच्या भूमिकेचा व्हिडीओ टीएमसीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.


टीएमसीच्या हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "विनेश फोगाट, तुम्ही जे यश मिळवलं आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. तू खरी योद्धा आहेस आणि नेहमीच राहशील. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


"माझ्यात जास्त ताकद राहिलेली नाही... मी हरलेय..."; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा