लातूर : विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लवकरच निवडणुकीची घोषणा होणार असून त्या दृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तसेच नेतेमंडळी कामाला लागले आहेत. काही नेत्यांनी आपापल्या मतदारसंघाची बांधणी चालू केली आहे. दरम्यान, याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. लातूरमधील निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यावर टीका केलीय. प्रत्येक निवडणुकीत डाव वेगळा असतो. मुस्लीम समाजाने लोकसभा निवडणुकीत जे केलं ते यावेळी विधानसभा निवडणुकीत होणार नाही, असं ते म्हणाले आहेत. 


अमित देशमुखांवर टीका 


संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगा तालुक्यातील वडगाव येथे आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलत होते. प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो. मुसीलिम समाजाने लोकसभा निवडणुकीत जे केलं ते विधानसभेत नक्कीच करणार नाहीत, असा विश्वास निलंगेकर यांनी व्यक्त केला. तसेच आपल्या भाषणात ते काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यावर त्यांचे नाव न घेता चौफेर टीका करायलाही विसरले नाहीत.  


भाजपाला कमी मतदान झालं म्हणून...


प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो. लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून भाजपाला कमी मतदान पडले. काँग्रेसला निलंगा विधानसभा मतदारसंघातून वीस हजाराची लीड मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही. लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर निलंगा विधानसभा मतदारसंघांचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला कमी मतदान झालं म्हणून लातूरचे लोक विधानसभेच्या निवडणुकीतही मला आव्हान देत आहेत, असा टोला निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना त्यांचे नाव न घेता लगावला. ही लढाई बऱ्याच वर्षापासून लातूर विरुद्ध निलंगा अशीच चालत आली आहे. ही लढाई आता वर्चस्वाची झाली आहे, असंही ते म्हणाले. 


2019 साली काय घडलं होतं?


दरम्यान, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघात चांगलीच चुरस रंगली होती. या निवडणुकीत निलंगेकर यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने चांगलाच जोर लावला होता. पण शेवटी संभाजी पाटील निलंगेकर यांनीच या निवडणुकीत बाजी मारली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना 31131 मतांनी पराभूत केले होते. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :


विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये कोणाचं वर्चस्व? कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार? सध्याची राजकीय परिस्थिती काय?