मुंबई: सांगलीच्या जागेवरून (Sangli Lok Sabha Election) आता महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता असल्याचं दिसतंय. मैत्रिपूर्ण असो वा शत्रूत्वाची लढत असो, मी सांगलीची निवडणूक लढणार असा निश्चय विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केला आहे. तर पक्षाने आदेश दिला तर सांगलीमध्ये मैत्रिपूर्ण लढत दिली जाईल असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Vishwajeet kadam) यांनी केलंय. सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा करत परस्पर उमेदवार घोषित केल्यानंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले असून त्यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. 


मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीनंतर विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस हा जबाबदार पक्ष असून मित्रपक्षांसोबत चर्चा केल्याशिवाय परस्पर जागा जाहीर करत नाही. सांगलीची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढत असो वा शत्रुत्वाची लढत असो, मी लढायला तयार आहे. पक्षाने जर आदेश दिला तर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. 


शिवसेनेला आघाडीचे काही माहिती नाही


विशाल पाटील म्हणाले की, ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे की शिवसेना आघाडीमध्ये आली आहे. या  आधी काँग्रेस राष्ट्रवादीची जागावाटपाची एक जुनी पद्धत होती. कोण कुठली जागा लढवायची हे एकमेकांना माहिती होतं.  पण शिवसेनेने कोणतीही चर्चा न करता परस्पर नावं जाहीर केली आहेत. सांगलीतील सर्व नेत्यांनी सांगितलं आहे की सांगली आणि इतर जागेवर तडजोड नाही. काँग्रेस हा जबाबदार पक्ष आहे, त्यामुळे चर्चा केल्याशिवाय नावं जाहीर करणार नाही. आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ असून विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल. 


त्या आधी विश्वजित कदमांनी म्हटलं की, सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. या ठिकाणी जर पक्षाचा आदेश आला तर आम्ही मैत्रिपूर्ण लढत देऊ. त्यानंतर विशाल पाटील म्हणाले की, पक्षाकडून आदेश आल्यानंतर मी निवडणूक लढणार. आम्हाला खात्री आहे, काँग्रेसकडून सांगलीची जागा परत घेतली जाईल. 


मैत्रिपूर्ण लढतीसाठी तयार, विश्वजीत कदमांचं वक्तव्य


विश्वजीत कदम म्हणाले की, आज आम्ही मल्लिकार्जुन खरगे यांची भेटी घेतली. सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरीक मतदारसंघ आहे. मित्र पक्षाला ही जागा काँग्रेसला सोडण्याच्या विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलो. सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रसेचकडेच राहीला पाहिजे. बाळासाहेब थोरातांनी देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज जो निर्णय घेतील त्या पक्षाकडे जागा जाईल असं ठरलं होतं. त्यांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा केली.  जर पक्षाचा आदेश मिळाला तर आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत. महाराष्ट्राच्या इतर जागेसंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांनी योग्य निर्णय घेतला असेल. मात्र सांगलीची जागा अद्याप काँग्रेसने सोडली नाही. 


ही बातमी वाचा: