Sanjay Raut on Vanchit Bahujan Aaghadi : मुंबई : वायव्य मुंबईची जागा ठाकरे गटाला (Thackeray Group) गेल्यामुळे नाराज झालेले संजय निरुपमांनी (Sanjay Nirupam) शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचंही निरुपम म्हणाले. अशातच, संजय निरुपमांनी अमोल किर्तीकरांचा (Amol Kirtikar) उल्लेख खिचडी चोर असं संबोधलं आहे. आता काँग्रेसच्या (Congress) संजय निरुपमांना ठाकरेंच्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) जशास तसं उत्तर दिलं आहे. मुंबई (Mumbai News) हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचेही पॉकेट्स आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनेनं मुंबईत वर्चस्व नाही, हे सत्य स्विकारलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आपल्याला अस्तित्व पाहिजे म्हणून एखाद्या पक्षानं कुठे जागा मागावी, हे आघाडीत ठिक नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "मला वाटत नाही कुठे नाराजी आहे. जागावाटप महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही दोन-अडीच महिने एकत्र बसून, चर्चा करुन प्रत्येक जागेचा, प्रत्येक भागाचा विचार करुन केलेला आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचेही पॉकेट्स आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनेनं मुंबईत वर्चस्व नाही, हे सत्य स्विकारलं पाहिजे. आपल्याला अस्तित्व पाहिजे म्हणून एखाद्या पक्षानं कुठे जागा मागावी, हे आघाडीत ठिक नाही." 


काँग्रेस ठाकरे गटाला शरण गेलं, असं वक्तव्य करणाऱ्या संजय निरुपमांनाही राऊतांनी खडसावलं आहे. संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मला एकतरी जागा मिळायला हवी. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती. त्यापूर्वीही नव्हती. राज्यात काँग्रेसची एकच जागा होती. आज काँग्रेस 16 जागांवर लढणार असून त्यापैकी 10 जागांवर जिंकणार आहे. म्हणजे, गेल्या निवडणुकीतील एक जागा आणि यंदाच्या निवडणुकीत थेट 10 जागा, यावरुन काँग्रेस शरण गेली असं कसं म्हणता येईल?"


"पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही, त्याला काही उत्तर आहे का? आमची रामटेकची जागा, जिथे सध्या आमचा विद्यमान खासदार आहे. ही जागा आम्ही आज जिंकत नाही, गेली 25 ते 30 वर्ष आम्ही ती जागा जिंकतोय. सातत्यानं जिंकत आहोत. ही जागा काँग्रेसला हवी आहे, त्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. मग आता आम्ही असं म्हणू का? रामटेकमध्ये आम्ही काँग्रेसला शरण गेलो."


सांगलीत चंद्रहार पाटलांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली, त्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरु होती. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे जागाच नाहीत. कोल्हापूर आमची हक्काची जागा आहे. 30 वर्ष आम्ही ती जागा लढतोय. कधी हरलो, कधी जिंकलो. सिने अभिनेते रमेश देव हेदेखील कोल्हापूरमधून शिवसेनेकडून लढले आहेत. कोल्हापूरची जागा आमचं ठरलं शाहू महाराज लढत आहेत आणि महाविकास आघाडीकडून लढत आहेत."