नवी दिल्ली: सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाकरे गटाकडून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवार यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, काँग्रेस पक्ष सांगलीची जागा (Sangli Loksabha) ठाकरे गटासाठी सोडायला तयार नाही. त्यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) आणि इच्छूक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बुधवारी थेट दिल्लीत जाऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. यावेळी विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेत सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे, असे ठणकावून सांगितले. 


गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते. सांगलीचा पुढचा खासदार विशाल पाटील हेच असतील, अशी खात्रीही अनेकांना होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेसाठी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. बुधवारी ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या उमेदवार यादीत सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील यांचेच नाव होते. परंतु, काँग्रेस पक्ष ही जागा सोडायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज झाले होते. त्यांच्या या नाराजीला न जुमानता ठाकरे गटाच्या उमेदवारी यादीतही सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांनाच उमेदवारी दिल्याने हा वाद चिघळला आहे.


सांगलीत आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार, विश्वजीत कदमांची ऑफर


विश्वजीत कदम यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क कसा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, मी आज दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. सांगली हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला हवा आहे, याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे आम्ही मल्लिकार्जून खरगे यांना सांगितले. विशाल पाटील यांची उमेदवारी मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी निश्चित केली आहे. शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत. पक्षाचा आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ते करु. आता सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, विशाल पाटील आणि आम्ही सगळे मिळून पुढील निर्णय घेऊ, असे विश्वजीत कदम यांनी सांगितले. 


काँग्रेस हायकमांड उद्धव ठाकरेंशी बोलणार?


सांगली लोकसभेची जागा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. ही जागा काँग्रेससकडे राहावी, अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली. ठाकरे गटाने जाहीर केलेला उमेदवार मविआचा नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे कधीही ठरलं नव्हते. शाहू महाराज ज्या पक्षातून लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी, असं ठरलं होते. या जागेबाबत काँग्रेसचे वरिष्ठ हे राज्यातील नेत्यांशी आणि शिवसेना नेत्यांशी बोलतील, अस आश्वासन आम्हाला आज देण्यात आल्यचे विश्वजीत कदम यांनी सांगितले.


आणखी वाचा


आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विशाल पाटील स्पष्टच बोलले