(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinod Tawde: संघटनेत कमबॅक करण्याचा 'तावडे पॅटर्न', 2019 मध्ये डावलल्यानंतर कमी काळात राष्ट्रीय पातळीवर बस्तान
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांचं तिकीट कापलं गेलं, ज्यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली त्याच विनोद तावडेंनी अवघ्या 4 वर्षात पुन्हा पक्षाचा, हायकमांडचा जबरदस्त विश्वास कमावत कमबॅक केल्याचं दिसतंय.
Vinod Tawde's journey in BJP: भाजपचे विनोद तावडे सध्या राष्ट्रीय पातळीवर एक एक पायरी चढत चाललेत. नुकतंच त्यांना लोकसभा 2024 साठी एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वी 2019 मध्ये त्यांना डावलल्याची चर्चा होती. त्यानंतर आता तावडे मात्र संयमी पद्धतीनं कमबॅक करताना दिसत आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांचं तिकीट कापलं गेलं, ज्यांना डावलल्याची चर्चा सुरु झाली, त्याच विनोद तावडे यांनी अवघ्या 4 वर्षात पुन्हा पक्षाचा, हायकमांडचा जबरदस्त विश्वास कमावत कमबॅक केल्याचं दिसतंय. 2019 नंतर राष्ट्रीय स्तरावरच सक्रिय झालेल्या विनोद तावडे यांना टप्याटप्यानं महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्यात. त्यात भाजपच्या मिशन 2024 साठी एका महत्वाच्या समितीवर तावडेंची नियुक्ती हे ताजं उदाहरण.
Vinod Tawde's journey in BJP: तावडेंना लोकसभा 2024 मिशनसाठी मोठी जबाबदारी
भाजपनं 2024 च्या पायाभूत नियोजनसाठी एक महत्वाची समिती नेमलीय. त्यात विनोद तावडे हे निमंत्रक तर त्यांच्यासोबत सुनील बन्सल, तरुण चुग हे महासचिव काम करणार आहेत. लोकसभा प्रचारासाठी केंद्र, राज्य पातळीवरील नेत्यांचे दौरे ठरवणं, जिथं भाजप दुसऱ्या क्रमांकावर तिथं भाजपचा उमेदवार निश्चित करणं यासाठीची जबाबदारी या समितीवर आहे. होळी संपल्यानंतर लगेचच या समितीचं काम सुरु होणार आहे. एखाद्या संस्थेत, पक्षात कमबॅक कसं करावं याचं एक आदर्श उदाहरणच तावडेंनी घालून दिलंय असं म्हणायला हवं. 2019 मध्ये आधी त्यांच्याकडचं महत्वाचं मंत्रिपद काढलं गेलं, त्यानंतर तिकीट कापलं गेलं. त्यानंतर तावडे यांचे पंख कापल्याची चर्चा सुरु झाली. तावडेंना दिल्लीत पाठवलं गेलं. पण राष्ट्रीय पातळीवर अगदी कमी वेळात तावडेंनी भाजपश्रेष्टींचा विश्वास कमावलाय. 2019 नंतर महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर हे तीन राष्ट्रीय सचिव पक्षात होते. पण त्यापैकी महासचिव म्हणून पुढच्या वर्षभरातच बढती मिळाली ती विनोद तावडेंना.
कमबॅक करण्याचा तावडे पॅटर्न
- 2020 मध्ये तावडेंची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती, त्यानंतर वर्षभरातच महासचिव म्हणून बढती.
- सुरुवातीला हरियाणाचे प्रभारी म्हणून ते काम पाहत होते.
- पण बिहारमध्ये जेडीयूनं भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपसाठी सर्वात महत्वाचं बिहार हे राज्य तावडेंकडे सोवपलं गेलंय.
- बंगालच्या निवडणुकीतही त्यांच्याकडे काही विधानसभा जागांची जबाबदारी होती.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाच्या संयोजनाचं कामही ते गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.
दरम्यान, विनोद तावडे हे 1985 ते 95 या काळात अभाविपचं काम करत होते. 1995 पासून ते भाजपमध्ये सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे 13 वर्षे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. 2014 ला बोरिवलीमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. भाजपमध्ये डावलल्याची चर्चा झाल्यानंतरही तावडेंनी संयम ढळू दिला नाहीय. कुठेही जाहीर वक्तव्यं करत ते बसले नाहीत. इकडे राष्ट्रीय पातळीवर नड्डांकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी येत होती, नव्या टीमच्या रचनेच्या शोधात ते होते. त्याचवेळी तावडेही दिल्लीत होते, कमी काळात त्यांनी बस्तान बसवलं. आता लोकसभा मिशनची ही जबाबदारी त्यांच्या करिअरला कुठे घेऊन जाते हे पाहुयात.