कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangale Lok Sabha Election) भाजपच्या वतीनं नाव समोर आल्यानंतर जनसुराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे (Vinay Kore) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, पण महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असं विनय कोरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवाराच्या नावाबद्दल अद्याप संभ्रम आहे. 


लोकसभेची मागणी नाही


लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून केली जाणार नाही, मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचा जनसुराज्य संवाद कार्यकर्ता मेळावा पार पडला. या प्रसंगी आमदार विनय कोरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.


हातकणंगले लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवारी बाबतीत सुरू असलेल्या चर्चांचे देखील कोरे यांनी खंडण केले आहे.यावेळी बोलताना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार विनय कोरे यांनी स्पष्ट केले.


हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटाचे असून त्यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचा अहवाल भाजपचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा उमेदवार बदलाच्या हालचाली आहेत. त्या ठिकाणी जर विनय कोरे यांना उतरवलं तर ते राजू शेट्टी यांच्या विरोधात जिंकू शकतात असं भाजपच्या अहवालात म्हटलं आहे.  त्यानतंर विनय कोरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांवर कोरे यांनी पडदा टाकला आहे. 


हातकणंगल्यावर भाजपचा दावा


दरम्यान, हातकणंगले मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याच्या तयारी महायुतीकडून करण्यात येत आहे. 


भाजपने कोल्हापूर किंवा हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यानंतर भाजपने काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. त्या बदल्यात भाजपने आता हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. 


ही बातमी वाचा: