Beed Walmik Karad Surrender : बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज अखेर पुण्यातील सीआयडीला शरण आला आहे. पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये कराडने शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडिओ शेअर करून मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 22 ते 23 दिवस उलटले आहेत. वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचा तपास बीड पोलिस घेत होते, मात्र आजच वाल्मिक कराड पोलिसांकडे न जाता पुण्यात सीआयडीसमोर का शरण आला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तर दुसरीकडे याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही यावर संशय व्यक्त केला आहे.
पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश नाही- विजय वडेट्टीवार
खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलीस, सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही. इतके दिवस वाल्मिक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले, या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे. महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की..
या वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी केली पाहिजे, आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही! अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हे ही वाचा