पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. हत्या प्रकरणात संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आलेले वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होते. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते. वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. 


दरम्यान, सीआयडीसमोर सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी स्वत: आपली प्रतिक्रिया देत  भाष्य केलं आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच मराठा क्रांती मोर्चाचे तीन ते चार कार्यकर्ते सी आय डी कार्यालयाच्या समोर घोषणा देण्यासाठी जमले आहेत. आज सकाळपासून वाल्मिक कराड पुणे कार्यालयात शरण येण्यापूर्वी काय काय घडलं? हे जाणून घेऊ.   


 पुणे कार्यालयात शरण येण्यापूर्वी काय काय घडलं?


वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार अशा २ दिवसांपूर्वी चर्चा


सकाळी ७ वाजता: पुण्यातील सी आय डी ऑफिस बाहेर आज वाल्मिक कराड याचे कार्यकर्ते आले एकत्रित


सकाळी ९ वाजता: सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त


सकाळी १० वाजता: पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि  गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सी आय डी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल


सकाळी ११ वाजता: १२ ते १ दरम्यान वाल्मिक कराड सी आय डी  कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर


दुपारी १२ वाजता: पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मिक कराड याने व्हिडिओ केला शेयर


दुपारी १२. १५ वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सी आय डी ऑफिस मध्ये दाखल


दुपारी १ वाजता: सी आय डी चे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराड ची चौकशी सुरु


ती स्कॉर्पिओ कोणाची?


दरम्यान,वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आला, त्या गाडीचा क्रमांक हा MH.23.BG.2231 असा आहे. ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे नामक व्यक्तीच्या नावे असून तो शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील पालीचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचे दिसून येते. मात्र, याबाबतही अधिकृत माहिती लवकरच समोर येईल. 


हेही वाचा


Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह