पुणे: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी रडारवर असलेले वाल्मिक कराड यांनी काहीवेळापूर्वीच  पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. सीआयडीसमोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर वाल्मिक कराड हे थेट पुणे सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सीआयडी ऑफिसबाहेर एकच गोंधळ उडाला होता. वाल्मिक कराड यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी याठिकाणी गर्दी केली होती. वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याता यावा, अशी मागणी होत आहे.


संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली होती. तेव्हापासून बीड पोलीस आणि नंतर सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर होती. मात्र, पोलीस किंवा सीआयडी कोणालाही वाल्मिक कराडला शोधण्यात यश आले नव्हते. अखेर 23 दिवसांनी वाल्मिक कराड स्वत:च्या मर्जीने सीआयडीच्या स्वाधीन झाले आहेत. यानंतर आता सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराड यांची चौकशी केली जाईल. मात्र, गेले 23 दिवस वाल्मिक कराड नेमके कुठे होते, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार,  वाल्मिक कराड सुरुवातीचे काही दिवस पुण्यातच मुक्कामाला होता. सीआयडी सूत्रांच्या मते, याप्रकरणात ज्या महिलेची चौकशी करण्यात आली, तिच्या पुण्यातील घरी वाल्मिक कराड मुक्कामाला होता. साधारण आठ दिवसांपूर्वी वाल्मिक कराड हे राज्याबाहेर गेले. तो कोणत्या राज्यात होता, याची खात्री नसली तरी गाडीने पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी वाल्मिक कराड यांना दोन दिवस लागल्याचे समजते. आता वाल्मिक कराडच्या चौकशीत याबाबतची अधिक माहिती समोर येईल.


वाल्मिक कराड सरेंडर होण्यापूर्वी नेमकं काय म्हणाला?


मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असे वाल्मिक कराड यांनी व्हिडीओत  म्हटले आहे.



आणखी वाचा


अखेर वाल्मिक कराड शरण! पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये लावली हजेरी