Vijay Wadettiwar नागपूर : औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) खोदण्यापूर्वी आपण केलेल्या पापांची कबर खोदावी, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी केली आहे. काही संघटना केवळ हिंदुत्वाच्या नावावरून स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम करत आहे. त्यांना इतर कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही. इतक्या वर्षापासून असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण करणं आणि इतिहासाला तोडून मोडून प्रदर्शित करणं, या ज्या गोष्टी राज्यात आणि देशात सुरू आहे ते केवळ घाण राजकारणातून केलं जात असल्याचा आरोप ही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी केला आहे.
किंबहुना हिंदुत्ववादी संघटनांना मला हे सांगायचं आहे की, औरंगजेब आपल्या हयातीत 27 वर्ष महाराष्ट्रात राहिलाय. तेव्हा तो महाराष्ट्राचं काही बिघडवू शकला नाही. तर मृत्यूनंतर त्याची कबर खोदल्याने आपलं काय होणार आहे? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
कुणाचीही तुलना औरंगजेबाशी करणे योग्य नाही- विजय वडेट्टीवार
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करत टीका केली होती. याच मुद्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतांशी फारकत घेतांना दिसले. मी हर्षवर्धन सपकाळ हे काय बोलले ऐकलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस असो कि आणखी कोणी असो, कोणाची अशी औरंगजेबाशी तुलना करणे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षेत वाढ
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता राजकारण देखील तापले आहे. तर, दुसरीकडे औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
मात्र, औरंगजेबाचाचे उदात्तीकरण नको, असे म्हणत कबर हटविण्याच्या मागणीसाठी संघटना रस्त्यावर उतरत आहेत. पुण्यात (Pune) काल पतित पावन संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळण्यात आला. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अशातच आता औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) खोदण्यापूर्वी आपण केलेल्या पापांची कबर खोदावी, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी केली आहे.
हे ही वाचा