सोलापूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे सर्व आमदार पाडण्याची घोषणा केली असताना आता भाजपकडून महिला वर्गाला साद घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राज्यात लाडकी बहीण योजना आल्यानंतर महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने निवडणुकीत फायदा होईल, असे नेत्यांना वाटते. त्यामुळे, या लाडक्या बहीण योजनेच्या अनुषंगाने पंढरपूरचे विद्यमान भाजप आमदार समाधान आवताडे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाला सुरुवात केली, पंढरपूर परिसरात झालेल्या त्यांच्या या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तर, दुसरीकडे भाजपचे प्रशांत परिचारक यांनीही महिला वर्गासाठी कार्यक्रम आखल्याचे दिसून आले. त्यामुळे, दोन्ही इच्छुक उमेदवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील टाकळी, कासेगाव अशा गावात हजारो महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमासाठी गर्दी केल्याने लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे. येथे भाजप आमदार समाधान अवताडे (Samadhan Awtade) यांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावत महिलांना रक्षाबंधनाची भेट म्हणून साड्यांचे वाटप केले. समाधान आवताडे हे देखील स्ट्राँग मराठा आमदार म्हणून ओळखले जातात, सर्व मराठा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, जरांगे पाटील यांनी भाजप आमदार पाडण्याची घोषणा केल्यानंतर अवताडे यांनी आता महिला वर्गाला साद घालत धाकट्या भावाच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठीच, हे कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढ्यातून इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील महिला आणि तरुण मतदारांना साद घालत आपल्या वाढदिवशी शहरातील इसबाबी परिसरात शाळकरी मुलींना सायकलीचे वाटप करत एक मोठा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होत परिचारकांना सपोर्ट असल्याचे दाखवून दिले. वास्तविक परिचारक हे अल्पसंख्यांक ब्राह्मण समाजाचे असून भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची तुतारी हाती घेण्याची मागणी केली आहे. मात्र, यावेळी परिचारक यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरायची शक्यता आहे. अशावेळी त्यांनीही पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात जोरदार तयारी सुरू केली आहे.
पंढरीत बहुरंगी लढत होणार
भाजपचेच दोन आजी-माजी आमदार आमने-सामने उभे ठाकल्याने त्यांची मदार महिला भगिनी मतदारांवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच दोन्ही आमदारांकडून महिलांना खुश करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे आमदार समाधान अवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक या दोघांनीही या कार्यक्रमानंतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे, आता या विधानसभेला अवताडे आणि परिचारक हे दोघेही निवडणूक रिंगणात असणार असून परिचारक महाविकास आघाडीतून उभारणार कि अपक्ष हेही लवकरच समोर येईल. गेल्यावेळी 2021 साली दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अवताडे यांना विजयी करण्यासाठी भाजप नेत्यांनी परिचारक यांना अवताडेंच्या पाठिशी उभे राहण्याचे सांगितले, ज्यामुळे भाजपने ही जागा जिंकली होती. आता, परिचारक आणि अवताडे हे दोघेही रिंगणात उतरल्यास भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्यावेळी थोडक्या मतात पराभूत झालेले भगीरथ भालके यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितल्याने येथील लढत बहुरंगी होणार हे नक्की. त्यामुळे, पंढरीच्या बहुरंगी लढतीत आमदार समाधान अवताडे हे आपली आमदारकी टिकविण्यासाठी जोरदार तयारीला लागल्याचे दिसून येते.
हेही वाचा
दहीहंडीत बक्षीस जिंकलं, पिकनिक ठरली; सेलिब्रेशननंतर काही तासांतच भिवंडीतील 2 गोविंदांचा मृत्यू