Sachin Ahir मुंबई : महायुती (Mahayuti) सरकारने दोन वर्षात फक्त आश्वासन दिलीत, पण आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. राज्यात घडत असलेल्या घटनांना सरकार जबाबदार असून यात सगळी जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यात आंदोलन होऊ नये यासाठी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण करावी. तसेच महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) संपूर्ण विभागांच्या चर्चा फेऱ्यांमध्ये सुरू आहेत. मुंबईची चर्चा सुरू असताना काही गोष्टी इतर पक्षांना सुद्धा सांगायच्या आहेत. जागा वाटपात कुठलाही विषय अडकलेला नाही. किंबहुना जागावाटप कधी पूर्ण करायचा हा स्ट्रेटेजीचा भाग असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली आहे.


लालबागची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या सगळ्या घटनेची चौकशी व्हायला हवी. अरविंद सावंत, अजय चौधरी घटनास्थळी गेले होते. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अजूनही एक व्यक्ती सिरीयस आहे. एका मुलीचा यामध्ये मृत्यू झालाय. बेस्टने आणि शासनाने मुलीच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे, अशी मागणी आमदार सचिन अहिर यांनी केली आहे.


मी पुणे शहराचा पालकमंत्री राहिलेलो आहे, घटनेला जबाबदार कोण?


शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधी जर गुंडांकडे जाऊन चहापाणी करत असेल,  त्यांच्या भेटी घेत असतील. तर अशा गोष्टी पुण्यात होणे दुर्दैवाने स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या होते आणि पोलीस म्हणतात अंतर्गत वाद आहे. अंतर्गत वादात पिस्तूल हत्यार आली कुठून? कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यामध्ये राहिलाच नाहीये का? मी पुणे शहराचा पालकमंत्री राहिलेलो आहे. तेव्हा असे प्रकार होतं असताना याला जबाबदार कोण असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. 


पुतळा कोसळल्या प्रकरणी गठित केलेली समितीकडून अजूनही पाहणी नाही


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना पद मिळाल्यानंतर त्यांना स्वतः लाच काही स्वप्न पडत आहेत. भाजपच्या नेत्यांना वाटतंय की इकडचं नेतृत्व जर केंद्रात केलं तर मग कोणाचा नंबर लागणार, आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःच्या घरात नेमकं काय चाललं आहे हे बावनकुळे यांनी बघावं. महायुतीतला मुख्यमंत्रीपदा चेहरा कोण? हे आधी बावनकुळे यांनी बघावं अशी टीकाही आमदार सचिन अहिर यांनी केलीय. पुतळा कोसळल्यानंतर त्यासाठी गठित केलेली समिती अजूनही त्या ठिकाणी न पोहोचणे, हे अवघड आहे.


सरकारची मानसिकता देखभाल करण्याची नाहीये. या सगळ्या विरोधात प्रचंड संख्येने जर लोक पुन्हा उतरले तर याची जबाबदारी कोणाची? असा सवालही अहिर  यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिलेला सल्ला नितेश राणे यांच्यापर्यंत पोहोचला नसेल. नितेश राणे यांनी जे स्टेटमेंट केलं आहे, त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजप नेतृत्वाचा समर्थन आहे का? हे स्पष्ट करावं, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.   


हे ही वाचा