Maharashtra Politics: मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील राजकारणात (Maharashtra Politicle Updates) अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणी टीका करत आहे, तर काही जुनी प्रकरणं बाहेर काढून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे नेते एकमेंकांवर टीका टिप्पणी करत आहे. तर, दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मनेस (MNS) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. मनसे कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाडीवर नारळ फोडला. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या. सर्व घडामोडी पाहता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झाला आहे. दरम्यान, आता या संघर्षाचा फायदा नेमका कोणत्या ठाकरेंना होणार? की भलताच पक्ष लोणी खाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. ठाकरे बंधूंमधील या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही नव्या नाहीत. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर 2006 मध्ये त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्ष स्थापन केला. तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे 18 वर्षांपासून दोन ठाकरेंमधील संघर्ष वेळोवेळी संपूर्ण राज्यानं पाहिला आहे. 


ठाकरे विरुद्ध ठाकरे संघर्षाचा फायदा कुणाला? 


काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या मनसेनं कात टाकत नव्या हिंदुत्वाची शाल पांघरली. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचा अजेंडा तेट मराठी माणसापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपसोबतचा काडीमोड आणि महाविकास आघाडीसोबतची सलगी यामुळे गोष्टी थेट हिंदुत्वापर्यंत पोहोचल्या. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भरकटले आहेत, असे अनेक आरोप झाले. पण लोकसभा निवडणुकीत मात्र, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचीच जादू पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत मतदारराजानं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. 


आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची चाचपणी सुरू आहे. अशातच शिवसेनेतील बंडानंतरची पहिली निवडणूक असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळणार यात शंका नाहीच. पण, विधानसभेसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली आहे. नुकतेच राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरुन परतलेत. मनसेकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मनसेचं आव्हान असणार यात काडीमात्र शंका नाही. 


महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही ठाकरेंची जमेची बाजू म्हणजे, मराठी मतदार. अशातच आता दोन्ही ठाकरेंमधील संघर्ष पेटल्यामुळे नक्की दोन्ही पक्षांचे आणि विशेषतः मराठी मतदार विभागला जाणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत या दोघांच्या मतदारांमध्ये फूट पडणार हे निश्चित. याचा फायदा कोणाला होणार? दोन भावांनाच होणार की, महाविकास आघाडी आणि एनडीएला होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शिवसेना आणि मनसेमध्ये कोणाची ताकद सर्वात जास्त? 


2009 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज ठाकरेंचे 13 आमदार विजयी झाले होते, तर त्याच निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे 44 आमदार विजयी झाले होते. 2014 आणि 2019 मध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचा प्रत्येकी एक-एक आमदार निवडून आला. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांचे 2014 मध्ये 63 आणि 2019 मध्ये 56 आमदार जिंकले होते. 2014 ते 2019 पर्यंत उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत युती होती आणि राज ठाकरे सुरुवातीपासूनच 'एकला चलो रे'च्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं. 


महाराष्ट्राचं राजकारण आता खूप बदललंलं आहे. उद्धव ठाकरे आता शरद पवार आणि काँग्रेससोबत आहेत, तर त्यांचे 40 आमदार बंडखोरी करून भाजप आणि अजित पवार यांच्यासोबत महायुतीत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आपला पक्ष जमिनीवर जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. आता राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.


यंदा महाराष्ट्रात 'खिचडी' विधानसभा निवडणूक?


राज आणि उद्धव यांच्यात लढत झाली तर उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून भाजपमध्ये सामील झालेल्या हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी काम करणाऱ्या नव्या शिवसेनेला याचा अधिक फायदा होऊ शकतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच पठडीत तयार झालेले दिग्गज पहिल्यांदात एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. या तिघांमधील वादाचा फायदा इतर पक्ष घेणार, यात शंकाच नाही. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका खिचडी निवडणुका असतील, असंच एकंदरीत आताच्या परिस्थितीवरुन दिसतंय.