मुंबई राज्यातील सर्व राजकीय पक्षांना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election)  वेध लागले आहेत. विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  हे देखील प्रत्येक मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघाला निरीक्षक नेमलेले आहेत यांच्याकडून आज मनसे अध्यक्ष यांनी आढावा घेतला तर उद्याही ते आढावा घेणार आहेत. त्यामुळे मनसे स्वबळावर लढणार अशी शक्यता आता वर्तवण्यात येतेय. 


राज ठाकरे आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार


लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मनसेने विधानसभेसाठी 200-250 जागांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे अशी माहिती मनसे नेत्यांनी महिनाभरापूर्वी दिली होती . यासंदर्भात महिनाभरापूर्वी निरीक्षक नेमून प्रत्येक मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे. चाचपणी केलेल्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार आहेत.


 मनसेच्या विधानसभा तयारीला वेग 



  •  मनसेने 200 ते 250 जागांवर काम करण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत घेतलाय 

  •  यासाठी मनसे नेत्यांची निरीक्षक म्हणून राज्यभरात अनेक मतदारसंघात नियुक्ती करण्यात आली होती 

  •  या मतदारसंघाची मनसे नेत्यांनी चाचपणी करत आखणी केली आहे 

  •  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून पुढील दोन दिवस आढावा घेत आहेत  

  •  70 ते 80 जागांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आढावा घेतलाय 

  •  तर पुढील काही दिवसात ते इतर जागांचा आढावा घेणार आहेत 

  •  प्रत्येक मतदारसंघातील आढाव्यानंतर ठाकरे हे दौरा करणार 

  •  ताकद असलेल्या मतदारसंघांमध्ये पक्ष संघटन वाढवणे तसेच आगामी विधानसभेच्या दृष्टीने काम करणे यावर भर देणार 


राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता


 मनसे स्वबळावर लढणार या चर्चेबरोबरच ते महायुतीत जाणाऱ्या बाबत देखील चर्चा आहे. मात्र 2014 आणि 2019  विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मनसे महायुतीत जाणार की स्वतंत्र लढणार यासंदर्भात अनेक चर्चा सध्या सुरू आहेत . मात्र मनसेने प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केलीय आणि राज ठाकरे स्वतः जातीने लक्ष घालत मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. त्यामुळे या सर्वाअंती मनसे महायुतीत जाणार की स्वतंत्र लढणार हे स्पष्ट होणार आहे. 


हे ही वाचा :


Video : राज ठाकरे 8,10 दिवसांनी, महिन्यांनी जागे झाले की उठतात आणि बोलतात; 'त्या' प्रश्नावर शरद पवारस्टाईल उत्तर, एकच हास्यकल्लोळ