मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मेळावा चिंचवडमध्ये तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचे अधिवेशन पुण्यातील बालेवाडी येथे पार पडले. राज्याच्या राजकारणात रविवारचा दिवस ह्या दोन्ही मेळाव्यातील भाषणांनी व टीकांना गाजला. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर टीका करताना थेट भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून हल्लाबोल केला. तर, औरंगजेब फॅन क्लब म्हणत उद्धव ठाकरेंनाही डिवचल्याचं पाहायला मिळालं. आता, या दोन्ही नेत्यांवरील टीकेवर पक्षाच्या नेत्यांकडून पलटवार केला जात आहे. सध्या महायुतीत असलेले आणि शरद पवारांना दैवत मानणाऱ्या अजित पवार यांना पत्रकारांनी शरद पवारांवरील टीकेसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, अजित पवारांनी (Ajit Pawar) सावध भूमिका घेत उत्तर देण्याचं टाळलं.  


महाराष्ट्रात खोटा नेरेटीव्ह पसरवत लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करण्यात आला. मात्र, देशातील जनतेने तिसऱ्यांना नरेंद्र मोदींनी पंतप्रधान केलं. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? अमित शाह म्हणाले, जो जिंकतो त्याचे सरकार असते. राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आमच्या 240 जागा आल्यात, या इंडिया आघाडीतील सर्वाच्या मिळून पण आल्या नाहीत, असे म्हणत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशावर भाष्य केलं. तसेच, शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या प्रमुखांवर अमित शाह यांनी टीका केली होती. त्याच अनुषंगाने महायुतीतील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनी उत्तर देणं टाळलं. 


काय म्हणाले होते अमित शाह


"भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले.  सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं", असं म्हणत अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुण्यातील मेळाव्यातून हल्लाबोल केला. त्यानंतर, शरद पवार गटाकडून अमित शाह यांच्यावर पलटवार केला जात आहे. मात्र, अजित पवार यांनी थेट उत्तर देणं टाळलं. त्यामुळे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. 


''मी सकाळपासून पिंपरी चिंचवड आणि पुण्यात आहे, त्यामुळे ते नेमकं काय बोलले हे मला माहिती नाही. अमित शाह नेमकं काय बोलले ते मला माहित नाही. मात्र, मी नेमकी टीका काय केली ती पाहून प्रतिक्रिया देईन'' असा सावध  पवित्रा अजित पवार यांनी घेतल्याचं दिसून आलं. दरम्यान, मी अमित शाह यांचे भाषण ऐकले नाही, मी भाषण ऐकल्यानंतर त्यावर भाष्य करेन, असे उत्तर हसन मुश्रीफ यांनी दिले. त्यामुळे, अमित शाह यांच्या दौऱ्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.


शरद पवार माझे दैवत


''शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काहीजण नेरिटीव्ह सेट करत आहेत,'' असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेवर पलटवार केला होता. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीत पालकमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातील खासदारांमध्ये जुंपल्याचं दिसून आलं होतं.  वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या आमदाराला धारेवर धरलं होतं. यावरून हे राजकारण पेटलेलं होतं. अखेर यावर अजित पवारांनी स्वतः उत्तर दिलं आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. 


काय म्हणाले धनंजय मुंडे


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही, मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटले, ते अहमदनगरमध्ये बोलत होते. मुंडेंनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साई समाधीचे दर्शन घेतले. अनेक वर्षांनंतर धनंजय मुंडे साई दर्शनाला आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.